चोखियाचे घरी नवल वर्तले ।...
चोखियाचे घरी नवल वर्तले । पाहुणे ते आलें देवराव ॥१॥
सोयर निर्मळा होत्या दोघी घरी । पाहुणा श्रीहरी आला तेव्हां ॥२॥
खोपट मोडकें द्वारी वृदांवन । बैसे नारायण तया ठायीं ॥३॥
दोघी प्रेमभरित धरिती चरण । घालितीं लोटांगण जीवेभावें ॥४॥
कोठोनियां स्वामी आलेती तें सांगा । येरू म्हणे पै गा दूर देशीं ॥५॥
झाले दोन प्रहर क्षुधेने पीडिलों । म्हणोनियां आलों तुमचे सदनी ॥६॥
कोणाचें हें घर सांगा हो निर्धार । ते म्हणती महार आम्ही असों ॥७॥
येरू म्हणें घरी कोण अधिकारी । कैसी चाले परी संसाराची ॥८॥
मग त्या ऐकोनी तयाचे बोलणें । म्हणती देवाजीनें निकें केलें ॥९॥
वंका म्हणे ऐसा कृपाळु श्रीहरी । चोखियाचे घरी राहे सुखें ॥१०॥