सुंदर पत्रे 63
रानात जाऊ तर नाना प्रकारची फुले लतावेलीवर आढळतील. त्यांची नावे गावे कोण जाणे? कुसरीचे वेल पांढ-या फुलांनी बहरलेले दिसतील. अग परवा एका गावी मी जात होतो. दुतर्फा जंगल होते. जंगलात मधून लाललाल काही दिसे. मला वाटे ही कसली फुले. परंतु ती फुले नव्हती, ती लालसर कोवळी पाने होती. पायरीच्या झाडांची ती पाने. किती सुंदर दिसत दुरून !
सुधामाई, चैत्र सुरू झाला तरी पहाटे अजून जरा गारवा वाटतो. धुकेही पडते. काल सकाळी आकाशात आभाळही जमून आले होते. एखादे वेळेस वादळ झाले तर आंब्याचे नुकसान व्हायचे. अजूनही काही काही ठिकाणी आंबे मोहरत आहेत. यांचे आषाढी एकादशींला होतील, - आणि वा-या-वादळातून पाऊसपाण्यातून राहिले तर.
नारायणाच्या देवळात रामनवमीचा उत्सव सुरु झाला. माझ्या लहानपणी हा उत्सव फारच छान होता असे. नारायणाच्या देवळासमोर तबकडीचा मोठा मांडव घालीत. चौघडा असे. परशुरामचा चौघडा प्रसिद्ध. तो बोलावीत. किरमिडेबुवा कीर्तनाला येत. म्हातारे झाले तेच येत. त्यांचे सारे दात पडले होते. त्यामुळे बोबडे बोलत.
“लालमा लामा हले हले लामा”
असे ते म्हणायचे. आम्ही मुले त्यांची थट्टा करीत असू. रामनवमीचा उत्सव आला म्हणजे गावात नवजीवन येई, जणू राम येई. रोज रात्री ९ दिवस तास-दीड तास पालखी नाचवीत. त्याला छबिना म्हणत. ताशा वाजत असे. त्याच्या ठेक्यावर पालखी नाचवीत. महादेवानांना, भिकुभटजी वगैरे फारत छान नाचवीत. तरुण मुले प्रथमच खांद्यावर पालखी घेत व दीक्षा घेत नाचवण्याची. खरा सोहळा रामनवमीस असे. मंडपात खुंडमामा कारंजाची सोय करीत. थुईथुई कांरजे उडे. भोवती घनदाट मंडप भरलेला कीर्तन सुरू असे. दुपारची वेळ. भरदुपारी रामराणा जन्माला यायचा. उकडत असायचे. आपल्या गावात त्या वेळेस कीर्तनमंडपात वारा घेण्यासाठी मधून मधून प्रतिष्ठित लोकांना विंझणे वाटण्यात येत. “टळटळीत दुपारी जन्मला रामराणा.” लहानशा रंगीत पाळण्यात रामाची मूर्ती ठेवती. हरदासबोवा झोका देत. रामजन्माची टाळी होताच बंदुकांचे वार उडत. चौघडा सुरु होई. ताशा वाजू लागे. देवदर्शनाला झुंबड उडे. नारायणाचे देऊळ असे म्हणत, परंतु मूर्ती राम, लक्ष्मण, सीता यांच्या होत्या. फार सुंदर सजवीत मूर्ती, मूर्तीच्या पाठीमागे मोराच्या पिसांचे पंखे असत. मी लहानपणी ते घ्यान पाहात राहात असे.
इकडे मंडपात टिप-यांचे खेल सुरु होत. गोफ विणला जाई. मला टिप-यांचा खेळ फार आवडतो. हिंदुस्थानभर हा खेळ आहे. हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. भारताला अनुरूप. सात रंगांच्या दो-यांना एकत्र गुंफायचे. विविधतेत एकता. भारतात नाना प्रान्त, नाना भाषा, नाना धर्म, नाना जाती. सर्वांमिळून एक विशाल संस्कृती निर्मावयाची. देवासमोर गोफ विणून हे ध्येय पुरे करू अशी जणू ग्वाही द्यावयाची.