सुंदर पत्रे 22
परवा मला अकस्मात पीतांबरभाईंचा नातू भेटला. किसनभाईंचा मुलगा. किती आनंद झाला. आपल्या गावचा कोणी भेटला की क्षणात सारा इतिहास डोळ्यांपुढे उभा राहतो. पीतांबरभाई आमच्या लहानपणी पंच होते. ते गावातील एक प्रसिध्द वैद्य होते. मी १०-१२ वर्षांचा असताना त्यांनी एकदा मला औषध दिले होते. त्यांच्या कानात मोठी भिकबाळी असे. बोटांत सल्लेजोडी व वळे असे. अंगावर एक उपरणे, डोक्यावर पागोटे असे. ते यायचे. गावात त्यांना मान होता. जुनी माणसे करारी असत, परंतु प्रेमळही असत. प्रेमाशिवाय जीवन शून्य होय.
परवा एका शाळेत मी गेलो होतो. मुलांमुलींचे फारच सुंदर कार्यक्रम तेथे झाले. नृत्य, अभिनय- सारे छान होते. मुरलीधराच्या मंदिरात एक हरिजन बालक जाऊ इच्छितो. पुजारी येऊ देत नाही. बालक बाहेर धावा करतो. मुरलीर- हातात मुरली असलेला- भक्ताला भेटायला येतो. देव गाभा-यातून बाहेर येत आहे असे पाहून पुजारी घाबरून पळतो. बन्सीधर कृष्णकन्हैया त्या बालकास भेटतो. देव व भक्त नाचतात फार सुंदर होता तो प्रसंग! माझ्या डोळयांत अश्रू आले. कृष्णाचे स्वरूप कोठेही पाहा. हृदय उचंबळतेच. मोराच्या पिसांचा मुकूट, गळ्यात वनमाला, हातात बासरी, नेसू पीतांबर. एका लहान मुलाने कृष्णाचे रूप घेतले होते. किती गोजिरी दिसत होती ती श्यामसुंदर मूर्ती!
एक शेवटचा संवाद तर अप्रतिम होता. एकेक मुलगी येते व भारताच्या एकेक प्रान्तातून आल्याचे सांगते. तामील प्रान्तातून आलेली म्हणते, ''इडली डोसा खाऊन आले.'' बंगालमधून आलेली म्हणते, ''रसगुल्ला खाऊन आले.'' मारवाडमध्ये गेलेली म्हणते, ''घी- शक्कर खाऊन आले.'' जणू ते भारत संमेलन होते. निरनिराळ्या प्रान्तांचे पोषाख मुलींनी केले होते. मारवाडी बाईंचा पोषाख करणारणीने तोंडावर घुंगट घेतला होता. परंतु 'घी- शक्कर खाल्ली पोटभर' म्हणताना तिने घुंगट क्षणभर बाजूस केला- व हशा नि टाळ्यांचा कडकडाट झाला!
शाळांतून असे नाट्यप्रवेश वरचेवर व्हावेत. त्यामुळे भावना वाढतात. कलासंवर्धन होते. शिक्षकांनीही त्यात सामील व्हावे. महान शिक्षणशास्त्रज्ञ गिजूभाई मुलांबरोबर नाटकात काम करायचे. रवीन्द्रनाथही करीत. मुलांमध्ये मिळून मिसळून पुन्हा एक प्रकारे अलिप्त राहण्याची कला ख-या शिक्षकाजवळ असायला हवी.
तुमच्या शाळेतील निवडणुका झाल्या का? यंदा मुख्य मंत्री कोण? तुम्ही मुलींनी निवडणुकीत भाग घेतला की नाही? मुले आम्हांला कधीच निवड़ून देणार नाहीत असे तुम्हांला वाटते. तुमची संख्या पडते कमी. तरी उभे राहावे, प्रचार करावा. गंमत असते.
तेथे अक्का, कुमू आहेत. रात्री खेळत असाल. रमी खेळता की ट्रिस्ट की ओपन झब्बू? अरुणा सारे पत्ते घेऊन बसत असेल मुळी. का देते खेळायला? तुमचा सर्वांचा वेळ जात असेल. कुमी मॅट्रिकचा अभ्यास करून फार वाळली होती. तेथील हवापाणी, नारळ, चिकू खाऊन जरा लठ्ठ होऊन येऊ दे. अक्काला बरे वाटते ना? ताई, अप्पा सारी ठीक? नंदाराज काय म्हणतात? त्याची सहल कुठे गेली होती की नाही? त्याचे गाल फार वर आले तर नाक दिसेनासे होईल हो. त्याला म्हणावे नाक थोडे ओढून उंच कर व गालावर थापटया मारून ते जरा खाली बसव. म्हणजे प्रमाणात सारे दिसेल! अरुणाला अण्णाचे धम्मक लाडूच दे दोन. मोठयांस नमस्ते व लहानांस आशीर्वाद.
अण्णा
ता. क. चित्रेकाकांची दाढ कशी आहे? काही दुखो, खुपो, त्यांचा अखंड कर्मयोग चालूच असेल. त्यांना सप्रेम प्रणाम.
साधना, ८ एप्रिल १९५०