सुंदर पत्रे 29
सुधामाई, हा उन्हाळाच बघ. एकीकडे कडक ऊन, मनस्वी उन्हाळा. नद्यानाले सुकून गेलेले. विहिरीत ठणठणाट. गुरांना चारा नाही. परंतु याच वेळेस झाडांना पालवी फुटते. आंबे, फणस, काजू, करवंदे, कोकंब, जांभळे, अळू- नाना प्रकारची फळे होतात. कोकिळा कुऊ करू लागते. उन्हाळयाचा त्रास म्हणावा तर हे रसाळ आनंदही आहेत. असे हे जीवन आहे. आपण चांगल्याकडे बघावे व आशेने आपले उद्योग करीत राहावे.
मी तुला मागे मांजरी व्यायली आहे म्हणून लिहिले होते. तिची पिले कुठे गेली कुणास ठाऊस! सुंदर होती पिले. कोणी का पाळायला नेली? का बोक्याने मारली? ती मांजरी काही दिवस म्याव म्याव करी. परंतु आता बहुधा विसरली दु:ख. परवा खोलीत आली तो आमच्या गणेशाने केवढ्याने थप्पड मारली. मला वाईट वाटले. डिच्चू म्हणाला, ''अरे, असं मारू नये. मरेल ती. मग जावं लागेल पायी काशीला.'' मी म्हटले, ''हातात विस्तव घेऊन जायचं असतं.'' कोणी म्हणाले, ''तो काडयाची पेटी हातात घेऊन जाईल.'' आम्ही तुरुंगात होतो. तेथेही एक मांजरी व्यायली होती. तिची लहान लहान गोजिरवाणी पिले. एक मित्र या पिलांना वर उडवायचे व झेलायचे. परंतु एकदा चुकून ते पिलू डोक्यावर खाली पडले आणि लगेच मेले! त्या आमच्या मित्रास अति दु:ख झाले. किती प्रेम करायचे पिलावर. परंतु इलाज काय? कोणी कोणी कौतुकाने लहान मुलांना असेच वर उडवतात. मला अशा गोष्टींची नेहमी भीती वाटते. अर्थात, या योगायोगाच्या गोष्टी असतात.
तुमची आता दीडमाही (तिमाही नावाला म्हणायची) परीक्षा असेल, नंतर महिनाभर सुटी. होय ना? अप्पाचा वाढदिवस केलात. पुराणपोळी केलीत. अप्पाचे आवडते पक्वान्न, होय ना? अप्पा लहान असताना बडोद्यास मावशीकडे शिकायला गेला. एकदा मावशीला म्हणाला, ''पुरणपोळी कर.''मावशीने पूर्वी कधी केली नव्हती. किती डाळीचे पुरण घालावे काही अंदाज तिला नव्हता. आणि शेवटी पुरण किती तरी झाले. पोळ्या संपता संपत ना भाजून, आणि मग चार दिवस त्या पुरल्या. पुरणपोळी शिळी चांगली अशी म्हणच आहे. परवा असे तर तुमचे नाही ना झाले?
तुमच्या तेथे उन्हाळा जाणवत नसेल. तरीही एखादे वेळेस तेथे त्रास होतो असे म्हणतात. सायंकाळीही आंघोळ करीत जा. तेथे रेडा लावतातच रहाटाला. बसा पन्हळीखाली. त्या लहान हौदात अरुणाला डुंबू दे. परंतु एखादे वेळेस बाधते हो पाणी. अरुणा जरा उंच झाली आहे असे कोणी तरी सांगत होते. उन्हाळ्याच्या सुट्टीतील तुमचे काय बेत? माणसाचे मन म्हणजे अद्भूत चीज आहे. रोज नवे बेत करता येतात. परंतु निश्चित काहीच झाले नाही तर सारे मनोरथ हवेतच राहायचे.
मी बरा आहे. रात्री आंघोळ करतो. त्यामुळे बाहेर निजता न आले तरी थोडीफार झोप येते. तुम्ही सारी बरी आहात ना? कुमी खूश आहे की नाही? सर्वांस स. प्रणाम. लहानांस स. आ. अरुणास मोठा आशीर्वाद.
अण्णा
साधना, २५ फेब्रुवारी १९५०