सुंदर पत्रे 2
आज आपले सारे जीवन भकास आहे, उदास आहे, कलाहीन आहे. खेड्यापाड्यातून शास्त्रीय दृष्टी घेतलेले शेकडो तरुण जायला हवेत. परिस्थितील अनुरूप असे उपाय सुचवून, प्रयोग करून सारे जीवन त्यांनी बदलून टाकायला हवे आहे. शनिमाहात्म्याचे रडके धर्म नष्ट होऊन कर्तृत्वाचा पुरुषार्थशाली धर्म यायला हवा आहे. रोग हटत आहे, स्वच्छता येत आहे. पाण्याची सोय होत आहे. पिके वाढत आहेत, बागा फुलत आहेत, जातिभेद जाऊन मानवता येत आहे. सहकारी ग्रामोद्योग वाढत आहेत, दुभते वाढत आहे, मोकळी, स्वच्छ, स्वस्त घरे बांधली जात आहेत, ज्ञानविज्ञानकला यांचे संगोपन होत आहे- अशी भारतीय खेडी व्हायला हवी आहेत. अंगात येणे, भुताटकी, मूठ मारणे, जादूटोणे, बळी देणे, सा-या प्रथा दूर होऊन शुध्द बुध्दीचा धर्म सर्वत्र रूढ करायला हवा आहे. यालाच मी वेदधर्म- म्हणजे ज्ञानावर, अनुभवावर, विचारावर आधारलेला धर्म म्हणतो.
मुंबईला नुकतीच 'रामराज्य' परिषद भरली. रामराज्याच्या बेट्यांना अर्थ तरी माहीत आहे का? यांना धर्मातील उदात्तता कळत नाही. अनुदार वृत्तीच्या लोकांना कुठला धर्म, कुठली मानवता? स्त्रियांचा आत्मा मुक्त केला तर का समाजाचे काही बिघडणार आहे? भारतात स्त्रियांची आजवर अवहेलना झाली. विवेकानंद स्त्रियांची दुर्दशा बघून रडले. जोवर स्त्रियांचा आत्मा मुक्त होत नाही, तोवर भारताला आशा नाही. स्त्रियाही आधी माणसे आहेत. मानवतेचे सर्व हक्क त्यांना मिळाले पाहिजेत. धर्माच्या नावाने येता जाता ओरडणारे लोकच आज धर्मभ्रष्ट झाले आहेत. उदात्ततेचा स्पर्शही त्यांच्या जीवनाला नाही. आणि गंमत ही की, काही प्रतिष्ठित स्त्रियाही धर्माचा पुळका येऊन आम्हा स्त्रियांना स्वातंत्र्य नको असे बडबडत आहेत. भारतातील कोट्यवधी स्त्रियांच्या दुर्दशेची यांना जाणीव आहे का? परंतु शेकडो वर्षे गुलामीत राहणा-यास गुलामीच प्रिय वाटू लागते. पुष्कळ वर्षांपूर्वी एकदा सेनापती एका गावी हरिजनवस्तीत गेले. तेथे त्यांचा तुरुंगातील एक मित्र होता. तो हरिजन मित्र भेटला. सेनापती म्हणाले, ''तुझ्या घरात काय असेल ते दे थोडे खायला. आंबील दे, भाकरीचा तुकडा दे.'' तो मित्र रडू लागला व म्हणाला, ''पूर्व जन्मी पाप केले म्हणून अस्पृश्य जातीत जन्मलो. आता तुम्हांला माझ्या घरी जेवायला घालण्याचे पाप करीन तर पुढचा जन्म आणखी कसला येईल कुणाला माहीत?'' खरोखर मानवाने मानवाची काय ही दशा केली? ज्या काही भारतीय भगिनीच हिंदू कायद्यांच्या सुधारणेबद्दल आकांडतांडव करीत आहेत त्यांची कीव येते.
सुधा, तू शीक आणि पुढे सेवेला वाहून घे. स्त्रियांची मान उंच कर. त्यांची अप्रतिष्ठा कमी कर. त्यांची बुध्दी जागी कर. त्यांची हिंमत जागी कर. त्यांच्यात स्वावलंबी व निर्भय वृत्ती निर्माण कर. निर्भय होणे म्हणजे मुक्त होणे.
परंतु बाळ, तू अजून लहान आहेस. मी हे लिहीत आहे ह्याचे कारण लहानपणीच तुझ्यासमोर हे विचार आले तर त्यातील थोडेफार टिकतील. लहान मुलांना महान विचार लौकर समजतात असा माझा तरी अनुभव आहे.
तु्म्हांला आता दहा दिवस सुट्टी आहे. खूप खेळा, गंमतजंमत करा, मजा कर. वनविहाराला जा. समुद्रात डुंबा. या दहा दिवसांत पोटभर मोकळी हवा, आनंद जीवनात भरून घ्या, म्हणजे पुढचे दोन महिने ती पुरेल. मग पुन्हा सुट्टी. खरे म्हणजे आपल्या सुट्टया जनतेच्या गरजेप्रमाणे द्यायला हव्यात. साहेबाने उन्हाळ्यात सुट्टी सुरू केली. आपणाला का उन्हाळ्यात शाळेत बसवणार नाही? हंगामात सुट्टी द्यावी. पावसाच्या आरंभी एक महिना, मग अश्विन-कार्तिक महिन्यात आणि शिमग्याच्या सुमारास. पावसाच्या आरंभी पेरणीचे काम असते. दिवाळीच्या सुमारास पहिल्या पिकांचा हंगाम असतो. शिमग्याच्या सुमारास रब्बीच्या पिकांचा हंगाम. शेतक-यांना या सर्व हंगामात मजूर भरपूर मिळत नाहीत. विद्यार्थ्यांनी जावे खेडोपाडी, काम करावे, मजुरी मिळवावी. स्वराज्यात सारे बदलायला हवे आहे. साहेबी थाट जाऊन, साहेबी सोयी जाऊन जनतेला अनुरूप सारे व्हायला हवे आहे. स्वराज्याचा आत्मा अजून दिसत नाही असे जे म्हटले जाते, त्याचा हाच अर्थ.