सुंदर पत्रे 19
चि. प्रिय सुधास,
सप्रेम आशीर्वाद.
तुम्ही पाठवलेला खाऊ पोचला. एका क्षणात आम्ही सारे त्याच्यावर तुटून पडलो. फन्ना उडविला. गोड काम लांबणीवर कशाला टाकायचे? मी इंग्रजी चौथीत होतो. आमच्या इंग्रजी पुस्तकांत मुलांच्या सहलीचा एक धडा होता. मुले आधी रानावनात हिंडतात. करवंदे खातात, आंबे पाडतात. शेवटी दमून भागून शिदो-या सोडतात. लेखक म्हणतो, ''त्यांनी जेवण लांबविले नाही. They made a short work of it.'' त्यांनी क्षणात केला चट्टामट्टा. आम्ही वयाने वाढलो तरी वृत्तीने मुलांप्रमाणेच आहोत. हीच वृत्ती राहो. सुधामाई, आमच्या खोलीतील मित्र अग, कधी कधी इतके हमरीतुमरीवर येतात की- मारामारी करतात. दोन दिवस मग खोलीत सारे चुपचाप असते. जेवताना कोणी बोलत नाही. जो तो स्वत:शीच लाजत खाजत जरा हसतो. अखेर कोणी तरी मौन मोडायचे धारिष्ट करतो व पु्न्हा खेळीमेळी सुरू होते. एक प्रकारची मजा असते, नाही?
सुधाताई, पालगडचे पत्र आले होते. यंदा रामनवमी यथातथाच झाली. मारुतिजन्मातही राम नाही. तो पूर्वीचा उत्साह कोठे गेला? आमच्या लहानपणी जो आनंद गावात असे तो आज का नाही? ही प्रगती का पुच्छगती?
कथा, कीर्तन, नाटक, मेळा, गोफ, यात्रा म्हणजे गावात केवढे चैतन्य असे. त्यात कालानुरूप भर घालायचे दूरच राहिले, परंतु पूर्वीचेही काही राहिले नाही. मी लहान होतो तेव्हा दादाही नाटकात काम करीत. आपले बाळतात्या झाले होते शंकर, व तुझे वडील म्हणजे आमचे दादा झाले होते गणपती! आणि अमृतलाल शेठजींचा मोहन मारवाडी तो झाला होता वानर! केवढी त्याची शेपटी, आणि तोंडाला काळे लावलेले! खूप मोठ्याने हुप् हुप् करीत तो उड्या मारी. परंतु 'नरवीर तानाजी मालुसरे' हे नाटक अजून माझ्या डोळ्यांसमोर आहे. भिकूतात्या जोशी यांनी तानाजीचे काम किती अप्रतिम केले ! आणि काळा विष्णु- यांनी सूर्याजीचे काम केले. तू म्हणशील काळा विष्णु म्हणजे काय? अग आपल्या गावात विष्णु नावाचे व जोशी आडनावाचे फार लोक. ओळखायचे कसे? मग एकाला 'गोरा विष्णु', एकाला 'काळा विष्णु' व तिस-या विष्णूला 'बाबाजी विष्णु' म्हणत. कारण त्या तिस-या विष्णूच्या वडिलांचे नाव बाबाजी असे होते. अग आपल्या गावात बाळूही पुष्कळ होते. बाळू पावणस्कर, सबनीस बाळू, वरवडेकर बाळू! निरनिराळी नावे आणायची तरी कोठून?
तू परवाचे ग्रहण पाहिलेस का? खग्रास ग्रहण होते. मी अंगणात खाटेवर पडून बघत होतो. शेवटी ग्रहण सुटू लागले, त्या वेळेस कसे तांबूस तांबूस चंद्रबिंब दिसू लागले. लहानपणी आजोबा मला उठवायचे. आम्ही ग्रहण लागण्याआधी स्नान करायचे. थंड पाण्याने स्नान. मग मी गणपती अथर्वशीर्षाचा ग्रहण सुटेपर्यंत जप करीत बसायचा. खरे म्हणजे अशा वेळेस दुर्बिणीतून गंमत पाहायची. परंतु कोठून आणायची दुर्बिणीतून गंमत पाहायची. परंतु कोठून आणायची दुर्बिण? तुमच्या शाळेत आहे का ग?
उन्हाला एकदम होऊ लागला. सारी फळे आता पिकू लागली. उष्णतेने भराभरा पिकतील. परवा काकुंकडे उकडगरे केले होते. फणस जून झाला की त्याचे गरे काढून ते उकडून तिखट-मीठ, फोडणी देऊन खायचे. छान लागतात. मलबारच्या बाजूला फणस फार! तिक़डे फणस ठेचून त्याचा लगदा करून मग त्याचे पापड करतात. तिकडे बाजारात ते विकायला येतात. जतीनच्या घरात फणसाचे पापड मी खाल्ले होते.