सुंदर पत्रे 48
चि. प्रिय सुधास,
सप्रेम आशीर्वाद.
तुझे सुंदर सहृदय पत्र वाचून किती आनंद झाला सांगू! कधी कधी खरेच तुझी पत्रे छान असतात. तुझी ही सहृदय वृत्ती कधी नष्ट न होवो. तुम्ही तेथे कच्चे आंबे विकत घेऊन आढी लावली आहे हे वाचून बरे वाटले. अरुणा येता जाता आंबा पिकला का बघते व 'अप्पा, पिकला, आंबा पिकला' करीत नाचते व 'ताई, आंबा खाऊ, गोड आहे. पडसं नाही व्हायचं, खातेच आता' वगैरे कसे बोलते ते तू लिहिलेस. लहान मुलांची खरेच गंमत असते.
आकाशात अभ्रे येतात. केव्हा तरी ख-या पावसाआधी धडकवणी पडल्याशिवाय राहणार नाही. लोक आता उन्हाळयात कंटाळले आहेत. हवेत केव्हा एकदा गारवा येईल असे सर्वांना झाले आहे. तुमच्या तेथे का थोडा पाऊस पडला? पुण्याकडे तर मध्ये चांगला गारांचा पाऊस पडला. तू गारा पाहिल्या आहेस? मी खानदेशात केवढाल्या गारा पाहिल्या होत्या! आणि तुला गंमत सांगू का? मी त्या वेळी अमळनेरच्या छात्रालयात राहात असे. पारोळयाकडचा रत्नापिंप्रीचा का धुळपिंप्रीचा पुन्या म्हणून एक मुलगा छात्रालयात होता. त्याचे नाव मोरेश्वर होते. परंतु पुनवेला झालेला म्हणून लाडके नाव होते पुन्या. त्याचा धाकटा भाऊ होता त्याला मुन्या म्हणत. तो फार बोलत नसे. गोड हसायचा. जणू मुनिमहाराज. म्हणून मुले त्याला मुन्या म्हणत. एकदा या दोन मुलांचे वडील अकस्मात आले.
''मुलांसाठी गारा घेऊन आलो आहे. आमच्या गावी पडल्या. येताना जरा विरघळल्या तरी अजून बघा केवढाल्या आहेत!'' प्रेमळ पिता म्हणाला. मुलांसाठी खाऊ आणणारे, लाडू आणणारे आईबाप असतील; परंतु सोळा मैलांवरून गारा घेऊन येणारे प्रेमळ वड़ील पाहून मी त्यांना मनात प्रणाम केला.
आपल्या पालगड गावी लहानपणी एकदा गारांची वृष्टी झालेली माझ्या ध्यानात आहे. अग विष्णु बिवलकरांची का कोणाची गाडी कापातून येत होती. वाटेत सापडली गारांच्या तडाख्यात. ताडताड गारा येऊन दगडासारख्या अंगावर पडत होत्या. परंतु वडाच्या झाडाखाली जरा आधार मिळाला म्हणून ते बैल व विष्णु बिवलकर निभावले.
मोरू ओक, विष्णु बिवलकर, सखाराम दिवेकर वगैरेंच्या बैलगाडया छान असायच्या. ते गाडीभाडे करायचे. उपजीविकेचा तो धंदा. ते बैलांची किती निगा राखायचे. आणि बैलांच्या गळयात साखळया व घंटा असायच्या. कपाळावर गोंडे, अंगावर झुली, गाडी पावंडयावर जायची. तीन तासांत गाडी कापात जायची. गाडीचा धंदा, परंतु तो जणू त्यांचा स्वधर्म होता. तुझे पणजोबा नेहमी विष्णु बिवलकरांच्या गाडीतून जायचे.