सुंदर पत्रे 3
आपल्या पायरे शेतातला कडबा चांगला झाला आहे. मधून मधून कोथिंबीर आहे. गुलाबाच्या चोंढ्यातील वाल मस्त आहे. परवा शेंगांचा लोटा भाजला होता. लोट्यात शेंगा भरायच्या. वर तिखट मीठ. नंतर तोंडावर पाला बसवून थोडे शेण थापून जाळात ते मडके टाकायचे. आत वाफेवर शेंगा शिजतात. मग त्या खायच्या. रानातील गंमत. त्या वेळेस राजाचे वैभव फिके वाटते. एका चोंढ्यातील वालावर मेकाडा पडला आहे. हा रोग का पडतो कोणाला ठाऊक! बांधावरच्या वालपापडीवरही हा रोग आहे.
दोन दिवसांपूर्वी गोविंदाने काही ओला वाल उपटून घरी आणला होता. आणि आम्ही अंगणात शेंगा काढीत बसलो होतो. गुरांना हा ओला टाळा फार आवडतो. शेंगा काढून मग आम्ही दाणे काढीत बसलो. गंमत म्हणून शब्दांच्या भेंड्या लावू लागलो. मी शेवटी 'ड' येईल असे शब्द सांगत होता. मुले रडकुंडीस आली. आपण बोर्डीस एकदा शब्दांच्या भेंड्या लावीत होतो व तुम्ही सारी एका बाजूला होऊन मला रडवलेत ते आठवते का?
परवा काकूने पपनस दिले होते. लहानपणी पपनस मला फार आवडे. मला किती तरी आठवणी झाल्या! आणि एकदा शिमग्याच्या दिवसांतील गोष्ट तुला सांगू का? माझ्या लहानपणी आपल्या गावात शिमगा चांगलाच माजे. रात्री गावातून जाणा-या बैलगाडयांना अडवून आम्ही पोस्त मागायचे. त्यांनी दिले नाही तर मग मोठी मंडळी यायची. या पोस्ताच्या पैशातून मग नारळ घ्यायचे. खायचे. शिमग्यात चो-या करायच्या. परंतु ती गंमत असे. अग आपली सरस्वती काकू. तिच्याकडच्या पपनशीवर किती तरी पपनसे ! आम्ही मुलांनी ठरवले की, रात्री पपनसे काढायची. काही मुले वर चढली. काही खाली. पपनसे आम्ही खाली टाकीत होतो. परंतु एक पपनस पत्र्यावर पडले. सरस्वती काकू जागी झाली. 'मेल्यांनो, चोरता का रे-'' म्हणत ती बाहेर आली. खालची मुले पळाली. मी झाडावर होतो. परंतु पळणा-या मुलांकडे सरस्वती काकू जात आहे असे पाहून मी शांतपणे दोन तीन पपनसे पिशवीत घालून हळूच खाली आलो व दुस-या बाजूने गेलो; आणि मारुतीच्या देवळात बसून मग आम्ही ती खाल्ली. आपल्या गावात ओकांकडे शिमग्याची पोपटी होत असे. थोडथोडी वर्गणी करीत. दशम्या आणि वांग्याची भाजी यांची मेजवानी असे. कधी भजी असत, कोणी भरीत करीत. शिमग्याचे ते दिवस गेले. आता त्याला नवीन सांस्कृतिक रूप येत आहे. अचकटविचकटपणा जात आहे. खेळ, शर्यती, कुस्त्या यांचे स्वरूप या सणाला येत आहे. शिमग्याच्या दिवसांत कोकणात तमाशे येऊ लागतात. आणि ते नाना प्रकारचें खेळये. 'डेरा' तुला आठवतो का? डे-याच्या तोंडावर चामडे बसवून त्याला पात्या लावलेल्या असत. या पात्यांवरून हात फिरवला की आवाज निघतो. आपला बाळ्या कांबळे डे-यावर नाचायचा! त्याच्याबरोबर एक राधा असायची. ते मोरांचे पिसारे पाठीवर बांधलेले. जणू कृष्ण ! गाणीही तो म्हणे. आणि पिसई गावाहून नकटा यायचा. काटखेळ करणारे यायचे. नवशी गावचा नकट्याचा खेळ चांगला की पिसई गावचा, अशी शर्यत लागे. नकटा म्हणजे रावण. त्याच्या तोंडावर रंगीत लाक़डी मुखवटा असे. हातात कोयता असे. पाठीला बांधलेली घंटा आणि दुसरी दोन माणसे राम व सीता बनत. रामाच्या हातात धनुष्यबाण असे. राम आणि सीता हातात हात घालून नाचत. रावण तो कोयता त्यांच्या अंगावर फिरवीत नाचे. मुले हळूच पाठीमागून जाऊन रावणाची घंटा वाजवीत. रावण एखाद्याला पकडी व आपल्या लाकडी कोयतीने त्याला मारण्याचा आव आणी. गाणे चालले असताना मृदंग व झांजा वाजत. तो आवाज मी जन्मभर विसरणार नाही. धुधु धुमधुम्, धुधु धुमधुम् असा तो आवाज.
''उठा उठा पंतोजी आंघोली करा हो आंघोली करा
गुरूच्या महात्म्यान् लागलाय् झरा हो लागलाय झरा
रावण खातो गा पानाचा इडा हो पानाचा इडा''