सुंदर पत्रे 23
चि. प्रिय सुधास,
सप्रेम आशीर्वाद.
तुझे पत्र मिळाले. तुमचे हळदीकुंकू थाटाने पार पडले वाचून आनंद झाला. मी आलो असतो तर थंडगार पन्हे प्यायलो असतो, आंब्याची डाळ खाल्ली असती. परंतु मी नसलो तरी तुम्ही सर्व होतात. अक्का होती व कुमू होती. तुम्ही केसांत वेण्या घातल्या असतील. कुमूला मात्र फूल नको. ती फूल दुरून बघते, हात नाही लावीत. मी एकदा मागे अलिबागला गेलो होतो. कुमीला म्हटले, 'ऊठ जरा.' ती उठेना. मग मी फुले घेऊन जवळ गेलो तशी ती उठली. 'नको रे अण्णा फुले आणू जवळ' असे गयावया करून म्हणाली. मला हसू आले.
तुम्ही हळदीकुंकवाच्या वेळेला तो शेतकरी नाच केलात का? तू भारतमाता ना होणार होतीस? अप्पा बासरी वाजवणार होता. ते काहीच लिहिले नाहीस. हळदीकुंकू नुसतेच खिरापतीचे नये करू. नाट्यप्रवेश, नाच वगैरेंनी कलात्मक आनंद निर्मावा. तुला नाच आवडतो. दादा नेहमी म्हणायचे, सुधा एकटी गाणे म्हणत असली तरी नाच असेल. तू जणू वा-याची झुळूक, समुद्राची लाट, वेलीचे डोलणे, होय ना? आनंदाची हीच वृत्ती जीवनभर राहो. सृष्टीच्या विराट नाचात आपणही सामील व्हावे.
तुमच्या तेथील रस्त्याच्या दुतर्फा करंजांची झाडे आहेत. पोपटी पालवी फुटून आता पांढरट निळसर फुलांचे गुच्छ त्यांच्यावर दिसतील. करंजाच्या झाडाखाली या बारीक फुलांची पखरण असते. समुद्रकिना-यावर ते बारीक चुरमुरे असतात, तशी ही फुले. या फुलांचा कडवट वास येतो, नाही? परंतु झाडे किती सुंदर दिसतात. आणि शिरीषालाही बहर येत आहे. रास्तुरे फुलले आहेत. आणि लालरंगी व पीतरंगी कृष्णचूडाची झाडे जणू पिंजर व हळद उधळीत आहेत असे वाटते. शेतांच्या वडांगींवर शेकडो प्रकारची फुले फुललेली दिसतात. मौज.
परवा मी इंदूरच्या आईकडे गेलो होतो. अग, इंदूचे वडील एकाएकी आजारी पडले. जात होते कामाला. रस्त्यातच घेरी आली, नाडी बंद झाली. जवळच डॉक्टर होते. मित्रांनी तेथे नेले. दोन सुया टोचल्या. शुध्द आली. जीवन हे असे आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. इंदूचे यजमान चौकशीला आले होते. येताना इंदूच्या भावंडांना त्यांनी द्राक्षे आणिली होती. इंदूचे वडील मला म्हणाले, ''अण्णा, कोणी येऊन दुखणं कमी होतं असं नाही. परंतु मनाला समाधान वाटतं की येऊन गेली चार माणसं. आपल्याबद्दल सहानुभूती आहे चार माणसांना.'' किती खरे आहेत ते शब्द!
इंदूचा लहान भाऊ वामन मोठा खोडकर. त्याच्यावर इंदूच्या नानांचे प्रेम. मला म्हणाले, ''लबाड हात वर करतो व म्हणतो- मी झालो उंच, तुमच्याएवढा मोठा. द्या आता पुष्कळ खाऊ.'' ते त्याला म्हणतात, ''वामन, पाटी घे, ग काढ.'' तर लगेच म्हणतो, ''तुम्ही जा कामाला. तुम्ही ग काढायला सांगता!''
मुलांची मौज असते. अग, शंकराचा धाकटा मुलगा आहे ना तो आगगाडी दिसताच ''ऑफिस गाडी ऑफिस गाडी'' असे म्हणतो. गाडी म्हणजे वडिलांना ऑफिसात नेणारी एवढीच त्याची कल्पना.
हे उन्हाळ्याचे दिवस. आपण आता गार पाणी पितो. मग खोकला होतो. शंकराला बराच खोकला झाला आहे. मला गार पाणी कधी बाधत नाही. कारण १२ महिनेच मी माठातले पाणी पितो. उन्हाळ्याच्या दिवसांत कोणी पाण्यात वाळ्याची जुडी टाकतात. पाण्याला एक प्रकारचा सुवास येतो. या दिवसांत लग्नमुंजीच्या वेळेस प्यायला पाणी असते त्याला वाळा टाकतात. तुझी आजी म्हणजे माझी आई होती ना, ती आपल्या बासनात वाळ्याच्या काड्या ठेवायची. कपडयांना मग कसर लागत नाही म्हणतात.