सुंदर पत्रे 18
महावीर शान्तीचे, सहनशीलतेचे सागर होते. त्यांच्या कानात कोणी खुंटी मारली तरी ते रागावले नाहीत. ते स्वत:ला निर्ग्रन्थ म्हणत. निर्ग्रन्थ म्हणजे ज्याने सा-या गाठी सोडविल्या, ज्याच्या जीवनात आसक्ती नाही, आपपर नाही, ज्याचे आतडे कोठे गुंतलेले नाही. ज्याला सारे समान.
जैन धर्म कर्माला, यत्नाला प्राधान्य देतो. जैन धर्मात ईश्वर म्हणून कोणी नाही. स्वत:च्या प्रयत्नाने तुम्ही तुमचा उध्दार करून घ्यावा. तीर्थंकर म्हणजे मानवच; स्वत:च्या प्रयत्नाने ज्यांनी पुरुषार्थ संपादला अशी थोर माणसे. मनुष्य स्वत:च्या प्रयत्नाने किती उंच जाऊ शकतो ते तीर्थंकर दाखवतात.
सुधामाई, भारतात विविध क्षेत्रांत थोर थोर माणसे होऊन गेली. सा-या जगात झाली. पूर्वी झाली. आज आहेत. पुढेही होतील. त्या त्या काळाला अनुरूप संदेश देणारे पुरुष त्या त्या काळातील खळबळीतून जन्मत असतात. लाटेवर जसा फेस त्याप्रमाणे त्या त्या काळातील वैचारिक लाटेवरचा स्वच्छ फेस म्हणजे महापुरुष होत.
तुमचा अभ्यास सुरू झाला का? आणखी एक महिन्याने उन्हाळ्याची सुटी होईल. तुम्ही कोकणात जाणार का? चैत्र महिना सुरू झाला. आता घरोघर हळदीकुंकवाचे समारंभ होऊ लागतील. डोल्ला-यात गौर बसवावयाची. माझ्या लहानपणी घरात रंगीत डोल्लारा होता; आणि गौरीच्या भोवती आरास करावयाची, पडदे सोडावयाचे. फुलांच्या माळा, घरातील कलात्मक वस्तू मांडावयाच्या. बायकांची ही स्नेहसम्मेलने. आंब्याची डाळ, पन्हे, कलिंगडाच्या फोडी. हरभ-यांनी किंवा भुईमुगाच्या दाण्यांनी ओटी भरावयाची. नारळाची खिरापत. पूर्वी बायका गाणी म्हणत. आता फोनो लावतात. हा एक प्रकारचा वसंतोत्सव असतो.
परंतु गावातील सर्व भगिनी येतात का? श्रमजीवी येतात का? सर्वांना समान पातळीवर कधी आणता? त्यांच्या अंगावर नीट वस्त्र आहे, केस विंचरलेले आहेत, तेल लावलेले आहे, मुलाबाळांच्या अंगावर कपडे आहेत, असे सर्व भगिनींचे केव्हा होईल? ही हळदीकुंकवे पाहिली म्हणजे हा विचार मनात येतो.
पांढरे चाफे आता मनस्वी फुलत आहेत. बकुळीही फुलू लागल्या आहेत. सृष्टी हळदीकुंकू करीत आहे, आणि कोकिळा कुऊ लागली आहे. कोकिळेचा आवाज मला वेड लावतो. तू पाहिली आहेस काळी कोकिळा? ती जरा लाजरी व बुजरी. झाडाच्या पानांत लपून बसते व तो उत्कट आवाज करते ते का तिचे प्रेमगीत असते? ती का प्रियकराला हाक मारीत असते? कोठे आहेस तू- ये, असे का म्हणते?
वसंत ॠतूचे वैभव बघायला रानावनात जावे, हिंडावे, फिरावे असे वाटते. परंतु वेळ कोणाला? तो वर्डस्वर्थ कवी म्हणे, ''The world is too much with us-'' हा संसार आपल्या शिरावर बसलेला असतो. या रोजच्या कटकटी छातीवर बसलेल्या असतात. सृष्टीचे दर्शन घ्यायला कसा कधी जाणार? सुधा, तू जात जा सृष्टीत. फुले, पाखरे बघ. जीवन समृध्द कर, आनंदी कर. अरुणालाही दाखवीत जा फुले. पक्षी. तीही कूऊ कूऊ करील व नाचेल.
सुधा, तुझी म्हणे झरणी बिघडली! परंतु दुरुस्त करता येईल. मुंबईस लिलूकडे पाठव. नारायणची परीक्षा संपली. गेला महिना त्याने खूप अभ्यास केला. त्याचे पेपर चांगले गेले आहेत. तो पुढे गोव्याकडे कदाचित जाईल. पुरे हो हे पत्र. अरुणास पापा. अप्पा, ताईस स. प्र. इतर नंदा, पपी वगैरे सर्वांस चिमटे.
अण्णा
साधना, १ एप्रिल १९५०