सुंदर पत्रे 39
चि. प्रिय सुधास,
सप्रेम आशीर्वाद.
तू चि. प्रिय मालतीच्या लग्नाला गेली होतीस, व लग्न नीट पार पडले, खेळीमेळीने सारा समारंभ झाला, लिलीने सुरेख मंगलाष्टके म्हटली वगैरे वाचून आनंद झाला आणि पतिगृही जाताना मालती रडू लागली व तिचा भाऊ गोपूही गोरामोरा झाला; इत्यादी तू लिहिलेले वाचून मीही गहिवरलो. मुलगी शेवटी सासरी जायची असते. ती जणू दुस-याची ठेव असते, जुनी नाती मनात ठेवून नवीन नाती जोडायला ती जात असते. सुख व दु:ख यांची ती घटका असते. परंतु सारे जीवनच असे आहे. योग आणि वियोग यांनी हे जीवन भरलेले आहे.
तू शाकुंतल नाटक वाचले असशील. ती गोष्ट तुला माहीत असेल. कविश्रेष्ठ कालिदासाने तेथे सहृदय प्रसंग रंगविला आहे. शकुंतला सासरी जायला निघते. आश्रमातील झाडेमाडे, पशुपक्षीही तिला प्रेमस्नेहाचा निरोप देतात व सद्भदित होतात. शकुंतलेला ज्याने वाढविले तो ऋषी कण्व म्हणतो,
''माझ्यासारख्यांचे हृदयही शकुंतला सासरी जात आहे या विचाराने भरून येते. मग सांसारिक किती दु:खी होत असतील.'' कण्व महर्षी तिचे समाधान करतात व म्हणतात, ''तुला परत आणू. उगी, रडू नको.''
सुधा, तू स्त्री- जीवनातील या प्रसंगावरच्या ओव्या वाच. स्त्रियांनी या प्रसंगावर अमर काव्य लिहिले आहे. जेवताना एका मैत्रिणीने ''जा मुली जा'' हे सुंदर गाणे म्हटले व आमचे घास हातातच राहिले म्हणून तू लिहिलेस. खरे आहे. भावना उचंबळल्या म्हणजे खाण्यापिण्याची शुध्द कोणाला राहणार?
हा लग्नाचा मोसम आहे. किती तरी ठिकाणी लग्ने होत आहेत. कोठेही जा. लग्नाला जाणा-या लोकांची गर्दी दिसेल. माझ्याकडे किती तरी लग्नपत्रिका येतात. उत्तरे तरी कितींना पाठवू? आणि जेथे लग्न लागते तेथे मंडळी असतात तास दोन तास. वेळेवर पत्र पाठवता आले नाही तर मागून पाठवायचे तरी कोठे? कारण नेहमीचे त्यांचे पत्ते माहीत नसतात व ते त्या पत्रिकांत नसतात. म्हणून मी पत्रिका हातात घेतो, क्षणभर डोळे मिटतो व वधूवरांची संसारयात्रा सुखाची, स्नेहाची, प्रेमाची नि सेवेची होऊन उभयतांचे जीवन कृतार्थ होवो अशी मनात प्रार्थना करतो. दुसरे काय?
कधी कधी कुठे लग्नाला जाताना भेट तरी काय द्यायची हा प्रश्न उभा राहतो. तुझ्या अण्णाजवळ आहे तरी काय? जवळ एखादे देण्यासारखे पुस्तक असले तर देऊन टाकतो. मजजवळ आता पुस्तकेही राहिली नाहीत. म्हणून एखादे वेळेस द्यावयास काहीच जवळ नाही म्हणून वाईट वाटते. परंतु मी मनाचे समाधान करतो. ''तू तुझी सदिच्छा दे'' असे मी मनाला म्हणतो.
सदिच्छेलाही किंमत आहे. किंबहुना बाहेरच्या देणग्या देत असताना मनात सदिच्छा नसेल, प्रेम- स्नेह नसेल तर काय उपयोग? परंतु सुधा, प्रेमाला कृतीत प्रकट व्हायची इच्छा असते. प्रेमाचे काही तरी प्रतीक हवे. मग ते रुक्मिणीचे तुलसीदल असो, द्रौपदीचे भाजीचे पान असो, शबरीची बोरे असोत, सुदाम्याचे पोहे असोत. काही तरी बाह्य चिन्ह हवे. एरवी प्रेमाला समाधान नाही. प्रेम सर्वस्वदानासाठी अधीर असते. दिल्याशिवाय प्रेमाला चैनच पडत नाही.