सुंदर पत्रे 28
कोकणात आता कामाची धूम आहे. भाताचे रोप लावण्यासाठी तेथे तर्वे भाजून तयार करून ठेवण्यात येत आहेत. गवतारू घरे शाकारताना जुना केंबळ खाली पडतो. हा केंबळ. त्याचप्रमाणे गावातील सारा पानपातेरा शेतात नेऊन जाळतात. शेताच्या बांधावर जो कवळठा असतो, ऐनाची वगैरे जी झाडे असतात, त्यांचा तोडून ठेवलेला टाळ शेतात पसरण्यात येतो. खाली शेण पसरतात. ते वाळलेले असते. आणि वर थोडथोडी माती पसरतात. पहाटेच्या वेळेस जरा दव पडते. त्या वेळेस या तरव्यांना आग लावतात. माती ओलसर असते. म्हणून किटाळे उडत नाहीत व जमीन हळूहळू नीट भाजते. जमीन भुसभुशीत होते. विषारी तणांचे बी मरते व पुढे भात पेरले म्हणजे त्यात इतर गवत उगवत नाही.
असे हे भाजवणीचे दिवस. या तरव्यांना कोणी ''दाढ'' असेही म्हणतात. तुझी एक लांबची आजी होती. पार्वतीकाकू तिचे नाव. ती देशावरची. एकदा आपल्या यजमानाबरोबर कोकणात आली. कोणी तरी म्हणाले, ''दाढीला आग लागली.'' हिला वाटले, कोणाच्या तोंडालाच आग लागली! ती घागर कळशी घेऊन बंगल्यात धावली. कोणी विचारले, ''पार्वतीकाकू, कुठं नेतेस पाणी?'' ''कोणाच्या लागली दाढीस आग?'' तिने विचारले. अशी ती भोळी. आई ही गंमत सांगे. तसेच एकदा वैश्वदेवासाठी एक थाबडा आण म्हणून आजोबांनी तिला सांगितले. थाबडा म्हणजे काय तिला कळेना. शेवटी आजोबा संतापले व म्हणाले, ''अग, ते बघ थीबडे, डोळे आहेत की नाहीत?'' ''म्हणजे शेणी होय?'' ती म्हणाली. ''हो, तुझी शेणी आण. इथं म्हणतात थाबडा.'' भाषा माहीत नसली म्हणजे अशा गंमती होतात. शिवाय एकच मराठी भाषा असली तरी निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे शब्द असतात. आपण इकडे नळावर ''अहो बाई, जरा दूर व्हा'' म्हणतो, परंतु व-हाडात बाई'' म्हणाल तर स्त्री चवताळून अंगावर येईल. तेथे त्या शब्दाला जरा निराळा अर्थ आला आहे.
सुधामाई, माझ्या एका स्नेह्याच्या पत्नीला अकस्मात मरण आले. मृत्यू ही एक कठोर घटना आहे. कवींनी काव्ये लिहिली, तत्त्वज्ञानांनी तत्त्वज्ञान सांगितले, तरी हृदयाची वेदना शमत नाही. आणि लहान मुलांना मृत्यूची कल्पनाच नसते. माझे मित्र तार येताच इंदूरला गेले. पुन्हा परत यायला निघाले. लहान मुलीला म्हणाले, ''येतेस ना मुंबईस?'' ती म्हणाली, ''तुम्ही जा. मी आईबरोबर येईन. दवाखान्यातून आई घरी येईल, आम्ही दोघं येऊ.'' त्या मुलीची समजूत कशी घालायची? तू वर्डस्वर्थ कवीची ''आम्ही सात आहोत'' ही कविता वाचली आहेस? ती मुलगी मेलेल्या भावालाही मोजते. ती म्हणते, ''तो भाऊ आहेच. तो तिथं निजला आहे. तिथं हिरवं गवत वाढतं. मी आईबरोबर तिथं जाऊन बसते. तो आमचा सातवा भाऊ. आम्ही सातजणं आहोत.'' शेवटी कवी म्हणतो, ''ते साधं मूल. What should it know of death? मरणाचं त्याला काय माहीत असणार?''
जीवनात दिवस आणि रात्र, संयोग आणि वियोग, सुख आणि दु:ख यांची खिचडी आहे. जगात केवळ सुख नाही. केवळ दु:ख नाही. सारे संमिश्र आहे. तू मादास चँग कै शेकचे नाव ऐकले असशील! त्यांनी मागे पंडीतजीना कसला तरी मुरंबा पाठविला होता. महाळुंगाचा होता की कसला होता कोणास ठाऊक! परंतु तो मुरंबा गोड असला तरी जरा कडवट होता. मादाम चँग कै शेकने पत्रात लिहिले, ''तुम्हांला हा मुरंबा पाठवीत आहे. चव गोड असली तरी जरा कडू वाटेल. जीवन असंच आहे, नाही का?''