सुंदर पत्रे 59
सुधामाई, आपण एकदा पालगड़ला चांदण्यात रात्री लंगडीने खेळत होतो, आठवते तुला? दादा, अक्का, तुझी आई सारी खेळत होतो. आणि वैनीने दादांना पकडले. परंतु दादांना वैनी सापडली नाही! अक्काने मात्र वैनीला धरले. मजा. केळांब्याच्या व जानकी वैनीच्या रातांब्याच्या छाया अंगणात नाचत होत्या. आपण खेळून दमलो; आणि घरातला एक पिकलेला फणस अंगणात बसून आपण मटकावला! आठवते तुला!
जुन्या आठवणी गंमतीच्या वाटतात! आज दादा नाहीत, वैनी नाही, परंतु या स्मृती आहेत. चैत्र वैशाखाचे दिवस आले! असे चांदणे पाहिले की त्या स्मृती पुन्हा जागृत व्हायच्याच, नाही? जीवनात जे दु:खे आहेत, सुखे आहेत. परंतु सुखांवर, आनंदावर दृष्टी देऊन आशेने माणसाने वागावे. फुले, फळे, पक्षी, आकाश, तारे, रवी, शशी, नद्या, सागर, वने, उपवने, मित्र, सखेसोयरे- या आनंदाच्या राशी आपल्या सभोवती आहेत. सायंकाळी हल्ली किती मस्त देखावा दिसतो ! ढगांचे शेत आकार दिसतात! क्षणात हत्ती तर क्षणात धावणारे ससे! क्षणात खादीचे पोशाख केलेले जणू ढेरपोट्ये व्यापारी, तर दुस-या क्षणी भरजरी पोशाख केलेले विश्वेश्वराचे भालदार चोपदार! अनंत रंगांची अनंत मिश्रणे! जणू विराट नाटक चाललेले असते. किती अंक, किती प्रवेश! आणि शेवटी सारे रंग लोपतात! गंभीर अंधार येऊ लागतो! शेवटचा काळा पडदा पडतो! रवीन्द्रनाथांना सायंकाळच्या कृष्णछाया नेहमी मृत्यूचे स्मरण करून द्यायच्या. जणू रोज सायंकाळी आपण आपलेच नव्हे तर सा-या समाजाचे, जगाचे थोडक्यात रुपकात्मक नाटक बघत असतो!
सृष्टीचे भक्तिप्रेमाने अवलोकन करण्याची आहे तुला सवय? तुला लहानपणी फुलांचे वेडे होते. ते वेड वाढत जाऊन सकल सृष्टीवर प्रेम करावयाचे वेड लागो. लहानसे फुले, लहानसे तृणपर्ण, लहानसा किडा, परंतु त्यांच्या जन्मासाठी कोट्यवधी वर्षे उत्क्रान्ती होत आली असेल. एखाद्या लहान फुलपाखराच्या पंखावरचे ते नयनमनोहर रंग सृष्टीत दिसायला लागण्यापूर्वी कोट्यवधी वर्षे होऊन गेली असतील! म्हणून लहानसा किडाही. चुकून चिरडला गेला तर मला चुकचुक लागते !
सुधा, मी तुला जवळजवळ गेले वर्षभर दर आठवड्यास पत्र लिहीत आहे. परंतु आजचे हे शेवटचे साप्ताहिक पत्र. आता तुला मी केव्हा तरी अधूनमधून लिहीन. परंतु आता बंधन नको. मलाही लांबलचक पत्रे लिहायला तितका वेळ नसतो. मागील वर्षी पावसाच्या आरंभी लिहायला सुरुवात केली व आता या वर्षाचा पावसाळा आला. दोन दिवशी मृग येतील. एक वर्षभर जवळजवळ नियम पाळला. वर्षांची ५२ पत्रे व्हावयाची परंतु ४२ च झाली. किती कसोशी केली तरी अधून मधून कधी कधी लिहायला जमले नाही. 'अण्णा, तुझी पत्रे पुस्तकरूपाने झाली तर सर्वांनाच आवडतील, देऊ का पुस्तकाकार करायला?' म्हणून तू विचारले होतेस, दे. ती तुझी आहेत, तुझा त्याच्यावर हक्क. ती तुला लिहिताना मी आनंद उपभोगला, कधी उचंबळलो, कधी गहिवरलो. कधी सृष्टीत रमलो, कधी गतस्मृतीत डुंबलो. तुझ्यामुळे मला हे सुख लाभले. म्हणून तुला सारे श्रेय! सुखी अस. आनंदी, उदार,कामसू, अभ्यासू हो. सदैव मनाने, बुध्दीने वाढती राहा. प्रिय अप्पास, सौ. ताईस स. प्र. आणि आता 'बे बे नको, आंबे द्या' म्हणणा-या लबाड अरुणास पाठीत पायरीचा हापूसचा गोडसा धम्मक आंबा दे.
अण्णा
साधना, १० जून १९५०