Get it on Google Play
Download on the App Store

सुंदर पत्रे 15

चि. प्रिय सुधास,

सप्रेम आशीर्वाद.

तुझे या वेळचे पत्र फारच छान होते. आणि तू लिहिलेस की, कोकणात पारिंग्याच्या झाडाला लाल फुले येतात. तुम्ही कशी पाहिली नाहीत? खरेच सुधा, आता मला आठवले. आपल्या अंगणाच्याच कडेला पारिंगा होता. त्याची फुले आता मला आठवतात. मुंबईच्या रस्त्यांच्या बाजूने लाल फुलांनी नटणारे पारिंगे काही विलायती पारिंगे नव्हेत. पारिंग्याच्या झाडाच्या मला दोनच आठवणी. एक म्हणजे त्याच्या पानावर आपण फेण्या घालतो, आणि दुसरी म्हणजे त्याचे लाकूड हलके असल्यामुळे त्याचा ओंडका कमरेला बांधून पोहायला शिकतात. या ओंडक्याला आपण पिढले म्हणतो. आणि दस-याच्या वेळेस पारिंग्याच्या पानांचेच बोळे घालून आपण फिटुकनळीतून उडवतो. मला या गोष्टी आठवत होत्या. फक्त ती लाल फुले कशी काय मी विसरलो हरी जाणे.

मी एका मित्राच्या मुलाच्या मुंजीसाठी गेलो होतो. सुखवस्तू आहे हा मित्र. मनाने, विचारानेही उदार. त्याच्या अंगणात सुंदर मांडव घालण्यात आला होता. छत होते. खांब कापडाने मढवलेले, महात्माजी, पंडितजी वगैरे थोरामोठ्यांच्या तसबिरी होत्या. अग, या मित्राच्या घरापुरती वीज आहे. त्यामुळे त्यांनी मंडपात, मंडपाच्या दारावर, जवळच्या आवळीच्या झाडावर विजेचे दिवे सर्वत्र नेले होते. रात्रीच्या वेळेस झाडांवरचे रंगीबेरंगी दिवे किती सुंदर दिसत! थोरामोठ्यांच्या घरचे कार्य म्हणजे सा-या गावाला आनंद. त्या मंडपात सर्व जातीजमातीचे लोक आंनदाने एकत्र जमले होते. सर्वांचे आगत स्वागत. गडीमाणसांनाही मंडपात बसवून प्रेमाने त्यांना पानसुपारी, अत्तरगुलाब सारे देण्यात येत होते. ती आस्था पाहून मला आनंद वाटला.

परंतु माझ्या मनात दुसरे अनेक विचार आले. मुंजीचा हा समारंभ आता निराळ्या पध्दतीने व्हायला हवा. मुंज, उपनयन याचा अर्थ काय? उपनयन म्हणजे गुरूजवळ नेणे. आपण मुलाचे नाव शाळेत घालतो त्याच वेळेस ख-या अर्थाने त्याचे उपनयन होते. मला कधी कधी वाटते की, गावात निदान तालुक्याच्या ठिकाणी तरी एक ज्ञानमंदिर असावे. तेथे भारतातील व जगातील सर्व क्षेत्रांतील ज्ञानी पुरुषांच्या तसबिरी असाव्यात. तेथे बटूला न्यावे. त्याला सांगावे, ''बाळ, या ज्ञानाचा तू वारसदार. या ज्ञानाची उपासना कर. या ज्ञानात भर घालून ॠषि-ॠण फेड. तू आज ज्ञानासाठी कंबर बांधलीस आणि हातात दंड घेतलास. ज्ञानप्राप्तीच्या आड जे मोह येतील, जी संकटे येतील त्यांना दूर पिटाळ. आजपासून तू व्रती, महान ध्येयासाठी धडपडणारा ब्रह्मचारी बटू.''

सुधामाई, उपनयनाचे समारंभ पहिले म्हणजे माझ्या मनात शत विचार येतात. उपनयनाच्या निमित्ताने वरील पध्दतीचा संस्कार- समारंभ करून विद्यादान करणा-या संस्थांस यथाशक्ती देणगी द्यावी. आज महाराष्ट्र विद्यापीठ उभे आहे. त्याला पैसा नाही. महाराष्ट्रात प्रतिवर्षी एक हजार मुंजी जर होत असतील व या मुंजीच्या निमित्ताने इतर खर्च कमी करून जर प्रत्येक मुंजीपाठीमागे शंभर रुपये महाराष्ट्र विद्यापीठास देतील तर, लक्ष रुपये दरसाल मिळत जातील. परंतु हे कोणाच्या लक्षात येते? विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता नेहमी म्हणत, ''हिंदुस्थानला अनाठायी दिडकी खर्चायचा अधिकार नाही, क्षण फुकट दवडायचा अधिकार नाही.'' किती यथार्थ हे शब्द! भारतात आज ज्ञानोपासना नाही. आपले सारेच जीवन उथळ झाले आहे. कोणतेही क्षेत्र घेऊन त्यात जीवनेच्या जीवने देणारे लोक आज हवे आहेत. तुला तो जुन श्लोकार्थ माहीत आहे?

सुंदर पत्रे

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
सुंदर पत्रे 1 सुंदर पत्रे 2 सुंदर पत्रे 3 सुंदर पत्रे 4 सुंदर पत्रे 5 सुंदर पत्रे 6 सुंदर पत्रे 7 सुंदर पत्रे 8 सुंदर पत्रे 9 सुंदर पत्रे 10 सुंदर पत्रे 11 सुंदर पत्रे 12 सुंदर पत्रे 13 सुंदर पत्रे 14 सुंदर पत्रे 15 सुंदर पत्रे 16 सुंदर पत्रे 17 सुंदर पत्रे 18 सुंदर पत्रे 19 सुंदर पत्रे 20 सुंदर पत्रे 21 सुंदर पत्रे 22 सुंदर पत्रे 23 सुंदर पत्रे 24 सुंदर पत्रे 25 सुंदर पत्रे 26 सुंदर पत्रे 27 सुंदर पत्रे 28 सुंदर पत्रे 29 सुंदर पत्रे 30 सुंदर पत्रे 32 सुंदर पत्रे 33 सुंदर पत्रे 34 सुंदर पत्रे 35 सुंदर पत्रे 36 सुंदर पत्रे 37 सुंदर पत्रे 38 सुंदर पत्रे 39 सुंदर पत्रे 40 सुंदर पत्रे 41 सुंदर पत्रे 42 सुंदर पत्रे 43 सुंदर पत्रे 44 सुंदर पत्रे 45 सुंदर पत्रे 46 सुंदर पत्रे 47 सुंदर पत्रे 48 सुंदर पत्रे 49 सुंदर पत्रे 50 सुंदर पत्रे 51 सुंदर पत्रे 52 सुंदर पत्रे 53 सुंदर पत्रे 54 सुंदर पत्रे 55 सुंदर पत्रे 56 सुंदर पत्रे 57 सुंदर पत्रे 58 सुंदर पत्रे 59 सुंदर पत्रे 60 सुंदर पत्रे 61 सुंदर पत्रे 62 सुंदर पत्रे 63 सुंदर पत्रे 64