सुंदर पत्रे 24
सुधामाई, अप्पा कोकणात जाणार आहे ना? एकटाच जाणार की तुम्ही जाणार? गुळांबा, काळांबा, केळांबा, टोकांबा, रातांबा, ढेरांबा, सारे ओथंबले असतील. जा खायला आंबे. घरचे आंबे खाण्यात मजा असते. ती ती आंब्यांची झाडे शत इतिहास सांगत असतात. आपला एक खोपटांबा होता. त्याच्याखाली लाकडाची खोपटी असायची. खोपटांब्याच्या ढोलीत साप होता म्हणतात. परंतु एकदा तो मरून पडलेला आढळला. त्याला का मुंगसांनी मारले होते? अशा अनेक आठवणी त्या त्या झाडांच्या आहेत. आणि अननसाचेही हेच दिवस. गिम्होणची आते होती तेव्हा आम्ही खूप अननस खात असू. अननसाचे फळ दिसते किती छान! सौम्य असा तो पिवळसर लालसर रंग. त्यात मधून हिरवी छटा. आणि फळ असते किती रुचकर!
तुम्ही जा कोकणात. महिनाभर आनंद लुटून या. सृष्टीच्या मोकळ्या सान्निध्यात राहून या. जुन्या नव्या माणसांना भेटून या.
चंद्रोदयांना कोकणात येता का म्हणून मी मागे विचारले होते. परंतु ते बंगालमध्ये गेले आहेत. आपल्या चंद्रोदयांचे मूळचे गाव आता पूर्व बंगालमध्ये आहे. कोमिल्ला शहराजवळ कांदिरपार म्हणून गाव आहे, ते त्यांचे जन्मग्राम. त्यांचे किती तरी आप्त तिकडे आहेत. काय असेल दशा? चांदपुरा येथे त्यांचे मित्र होते. परंतु सारे सुरक्षित आले. चंद्रोदय लिहितात, ''चांदपूरला सारे ठीक होते. तेथे दंगल नव्हती. परंतु पुढचे कोणी सांगावे? म्हणून मित्र निघून आले. यू. पी.मधून गेलेले अन्सार दंगली कत्तली माजवतात. मूळचे बंगाली मुसलमान या गोष्टीला विटले आहेत.''
सुधामाई, आपण इकडे हळदीकुंकवे करीत आहोत. रसपाने करीत आहोत. बंगालमध्ये हायहाय आहे. स्वातंत्र्यांच्या युध्दात बंगालने किती हुतात्मे दिले! धार्मिक चळवळीत केवढाली माणसे दिली! शैक्षणिक चळवळीत आशुतोषांसारखे अलौकिक पुरुष झाले. शास्त्रज्ञांत जगदीशचंद्र, प्रफुल्लचंद्र झाले! साहित्यात रवीन्द्र, बंकिमचंद्र, शरदच्चंद्र झाले! देशबंधू, अरविंद, नेताजी अमर नावे! बंगालने अर्वाचीन भारताच्या इतिहासात सर्व क्षेत्रात मोलाची भर घातली आणि त्यागही अपार केला. बंगाल अजूनही आगीतून जात आहे. दुस-या महायुध्दाच्या वेळचा तो भीषण दुष्काळ! आणि ती प्रचंड वादळे! आणि स्वातंत्र्याआधीच्या त्या कत्तली आणि नंतरच्या माणसांच्या अदलाबदली. वाटले की आता सारे शान्त होईल. तो कम्युनिस्टांनी सारख्या दंगली चालू ठेवल्या. त्यात पु्न्हा परवाची पूर्व बंगालमधील करुणगंभीर भेसूर कहाणी! बंगालच्या वेदनेला सीमा नाही. रवीन्द्रनाथ म्हणायचे :
''सोनार बांगला
आमी तोमाय भालोबासी''
हे सोन्याच्या वंग देशा, आमचे तुझ्यावर किती प्रेम! तो हा सोन्यासारखा देश पुन:पुन्हा 'भारतभाग्यविधाता' भट्टीत घालीत आहे. उरलेसुरले खळमळ जणू दग्ध होत आहे.
आज बंगालचे हृदयमंथन, जीवनमंथन सुरू आहे. शेवटी अमृत मिळो हीच प्रार्थना. आपण ३३ कोटी लोक आहोत. लहान मुले सोडून दिली तर ५-१० कोट लोक आपण आणा- अर्धा आणा पाठवू तर २०-२५ लाख रुपये मदत उभी राहील; परंतु प्रत्येकाला कर्तव्याचे भान हवे.
सुधामाई, मी एक दिवस जेवलो नाही. मित्र म्हणाले, ''का नाही जेवत?'' म्हटले, ''बरं नाही.'' मी एका दिवसाच्या उपवासाने स्वत:ला बंगाली बंधू-भगिनींशी मनाने जोडीत होतो. सुधामाई, तुझा तात्या त्या दुष्काळात बंगालमध्ये सेवा करायला गेला होता. भारतसेवा समाजाच्या साहाय्यकेंद्रात काम करीत होता. रोग फैलावू नये म्हणून तो इंजेक्शने द्यायला जायचा. परंतु वसंताने- तुझ्या तात्याने- मला लिहिले, ''मी इंजेक्शन द्यायला जातो. कॉलरा, देवी, टायफॉइड वगैरे साथी पसरू नयेत म्हणून. परंतु ते गरीब लोक म्हणायचे. 'इन्जेक्शनं कशाला? काही खायला द्या, काही ल्यायला द्या.''' सरकारतर्फे मोठा फंड निघाला आहे. प्रत्येकाने अलग अलग फंड करण्यात काय अर्थ? हे भगीरथ काम. सर्वांनी सरकारकडे रक्कम पाठवावी. सुधामाई, तुम्ही मुलींनी हिंडून मदत गोळा करावी व सौ. सुचेता कृपलानी, दिल्ली, या पत्त्यावर पाठवावी.
आपण किती देतो हा प्रश्न नाही. आपली मनोबुध्दी प्रमाण. उद्या निवडणुकीत दाखविण्यासाठी ही मदत नसो. ही निरपेक्ष मदत असो. लहानपणी 'कथासारामृत' नावाची एक पोथी मी वाचली होती. तिच्यातील एक गोष्ट मला कधी कधी आठवते. एका गावात रोज कीर्तन असे. एक मनुष्य रोज जाई. परंतु कीर्तनास बसला असता त्याच्या मनात घरी चोर तर नाही येणार, उद्या भाव काय असेल वगैरे विचार यायचे. दुसरा एक मनुष्य होता. तो जाऊ शकत नसे कथेला. परंतु त्याच्या मनात सारखे 'आता कीर्तन रंगात आलं असेल, आता भजन चाललं असेल, देवाची मूर्ती किती सुंदर दिसत असेल' वगैरे यायचे. पुढे दोघे कर्मधर्मसंयोगाने एकदम मेले. एकाला विष्णूचे विमान न्यायला आले, एकाला यमाचे आले, तेव्हा कीर्तनाला रोज जाणारा म्हणाला, 'देवाघरी न्याय नाही. मी रोज कीर्तनास जात असे; परंतु त्याला वैकुंठास नेणार!' विष्णूचे दूत म्हणाले, 'तू कीर्तनास जात असस परंतु लक्ष घराकडे. बाजारभावाकडे. हा घरी असे, परंतु लक्ष असे कीर्तनाकडे, देवाकडे.' शेवटी बाह्य क्रियेला महत्त्व नाही. तुमच्या अंत:करणातील वृत्तीला महत्त्व आहे. मनातील जिव्हाळ्यामुळे कार्यात प्राण येतो.