मीलन 3
‘शिरीष, करुणेला पूर्वीच रे का नाही आणलेस ? तिच्या संगतीत माझा उद्धार झाला असता.’
‘माझाही !’ शिरीष म्हणाला.
‘काही तरी बोलू नका.’ करुणा म्हणाली.
‘शिरीष, आम्ही भांडू असे का तुला वाटते ? अरे, श्रीकृष्णाच्या सोळा सहस्त्र नारी भांडत नसत. आम्ही दोन का भांडलो असतो ?’ हेमा म्हणाली.
‘श्रीकृष्ण सोळा सहस्त्र नारींना वागवू शकत होता, त्याची थोरवी आम्हा क्षुद्रांना कोठली ? आम्हाला एकीचेही चित्त सांभाळता येत नाही, तेथे दोघींचे कसे व्हायचे ?’
‘शिरीष, असे नको बोलू. आता आनंदी राहा. आता नाही ना उदास राहणार ? करुणे, शिरीष इतक्या वर्षांत मोकळेपणाने हसला असेल तर शपथ.’
‘करुणे, आपल्या विवाहाचा वाढदिवस लवकरच येईल. हेमा, आम्ही आमच्या विवाहाचा वाढदिवस साजरा करीत असू. एका वाढदिवसाच्या दिवशीच राजाचे दूत मला न्यायला आले,’
‘शिरीष, आपल्या लग्नाचा वाढदिवस तू का बरे कधी केला नाहीस?’
‘मनात शल्य होते म्हणून. आता तुझ्या लग्नाचाही दर वर्षी साजरा करु. परंतु दिवस आहे का लक्षात ?’
‘शिरीष, तो दिवस कधीतरी कोणी विसरेल का ?’
‘आज यात्रेच्या दिवशी हे अपूर्व मीलन.’
‘माझ्या प्रेमळ आईबापांचा हा आशीर्वाद.’
‘माझ्या सासूसास-यांचा आशीर्वाद.’