यात्रेकरीण 4
असा तो धावा होता. वल्हवणारे वल्ही मारीत होते आणि बाकी सारे शांत होते. आणि खरेच नाव धारेच्या बाहेर पडली. जयजयकार झाले. ‘तुमचा धावा देवाने ऐकला!’ लोक म्हणाले.
‘तुमच्याही प्रार्थना त्याने ऐकल्या.’ करुणा म्हणाली.
प्रवासात असे अनेक अनुभव येत होते. करुणेची श्रद्धा वाढत होती.
पुरे, पट्टणे, वने, उपवने ह्यांतून ती जात होती. जिकडे तिकडे राजा यशोधर व प्रधान शिरीष ह्यांची किर्ती तिच्या कानांवर येई. तिला अपार आनंद होई.
एकदा तर तिच्या कानांवर बातमी आली की, जवळच्या एका शहरी शिरीष आहेत. करुणेची धावपळ झाली. ती वायुवेगाने त्या शहराकडे निघाली. ती थकली; परंतु चालतच होती. मनाच्या वेगाने जाता आले असते तर ? वा-यावर बसता आले असते तर ? असे तिच्या मनात येई. त्या शहरी येऊन ती पोचली; परंतु ती बातमी खोटी होती. शिरीष नाही, कोणी नाही. ती निराश झाली.
चार महिने ती प्रवास करीत होती. राजधानी जवळ येत होती. तिचे निधान जवळ जवळ येत होते. स्वर्ग जवळ जवळ येत होता. हळुहळू राजधानी दुरुन दिसू लागली. करुणेने प्रणाम केला. मुक्तापूरला तिचे दैवत राहात होते.
शीतला नदी आली. शुद्ध स्वच्छ शांत नदी. करुणेने मंगल स्नान केले. ती नवीन निर्मळ धवल वस्त्र नेसली. योगिनीप्रमाणे निघाली. सोमेश्वराचा कळस दिसू लागला. त्या मंदिराकडे ती वळली. मंदिराचे प्रशस्त आवार होते. तडी, तापडी, साधू बैरागी ह्यांना राहाण्यासाठी तेथे ओव-या होत्या.
करुणा एका ओवरीत शिरली. तिने ती ओवरी स्वच्छ केली. तिने कंबळ घातले. त्यावर ती बसली. डोळे मिटून तिने ध्यान केले. कोणाचे ध्यान ? सोमेश्वराचे की प्राणेश्वराचे ? का दोघांचे ?