सचिंत शिरीष 2
‘आईबाप आता भेटणार नाहीत.’
‘कशावरुन ?’
‘ते ह्या जगात नाहीत.’
‘कोणी आणली ही दुष्ट वार्ता?’
‘मला स्वप्न पडले. त्यात आईबाप दूर गेलेले मी पाहिले आणि अधिका-यांकडूनही खुलासा मागवून घेतला. माझे आईबाप मेले. अरेरे!’
‘आपण त्यांच्या समाध्या बांधू.’
‘त्यांना जिवंतपणी भेटलो नाही. आता मेल्यावर समाध्या काय कामाच्या ? आता अश्रूंची समाधी बांधीत जाईन.’
‘शिरीष, तुम्ही आनंदी राहा. ज्या गोष्टी आपल्या हातच्या नाहीत त्यासाठी रडून काय उपयोग?’
‘परंतु ज्या हातच्या असतात, त्या तरी माणसाने नकोत का करायला?’
‘ते तुम्ही करीतच आहात. सा-या राज्याची चिंता वाहात आहात. फक्त माझी चिंता तुम्हाला नाही. सा-या जगाला तुम्ही सुखविता आणि हेमाला मात्र रडवता. शिरीष, अरे का? माझ्याजवळच तू उदासिन का होतोस?’
‘वेड़ी आहेस तू. हसून दाखवू?’
‘शिरीष, जीवन म्हणजे का नाटक?’
‘थोडेसे नाटकच. आपापले शोक, पश्चात्ताप, दुःखे, सारे गिळून जगात वावरावे लागते. आपले खरे स्वरुप जगाला संपूर्णपणे दाखवता येत नसते. ते दाखवणे बरेही नव्हे. आपल्यालाही स्वतःचे संपूर्ण स्वरुप पाहायचा धीर होत नसतो. हे जग म्हणजे परमेश्वराचे मोठे नाटक. ह्या मोठ्या नाटकात आपण आपापली लहान लहान नाटके करीत असतो.’