दुःखी करुणा 3
‘सासूबाई, घरात दाणे नव्हते. तुम्हाला खायला तरी काय देऊ ? मी मोळी घेऊन आल्ये; परंतु कोणी विकत घेईना. गावात हिंड हिंड हिंडले. शेवटी मोळी विकून हे दोन शेर दाणे आणले. आता दळते व देत्ये भाकर करुन. रागावू नका. भूक लागली असेल तुम्हाला; परंतु मी तरी काय करु ?’
करुणेने दाणे पाखडले. ती दळायला बसली. ती थकलेली होती, परंतु तिला कोठला विसावा? दोघांपुरते पीठ दळून ती उठली. तिने चूल पेटवली. म्हाता-यांस कढत कढत भाकर तिने वाढली. नंतर थ़ो़डा तुकडा खाल्ला.
सासूबाई अलीकडे फार बोलत नसत. जणू त्यांनी मौन धरले. पूर्वी शिव्याशाप, आता अबोला; परंतु करुणेला आता सर्व सवय झाली होती. सारे अंगवळणी पडले होते. येईल दिवस तो काढायचा असा तिने निश्चय केला होता.
परंतु त्या वर्षी दुष्काळ पडला. कित्येक वर्षात असा दुष्काळ पडला नव्हता. राजा य़शोधराने ठायी ठायी असलेली सरकारी कोठारे मोकळी केली. लोकांना धान्य वाटले जाऊ लागले. राजाच्या धान्यागाराजवळ माणसांची मुंग्यासारखी रांग लागे.
गावोगावची पेवे उपसली गेली. सावकार, जमीनदार ह्यांनी कोठारे मोकळी केली. एकमेकांस जगवू असे सारे म्हणत होते. मोठी कठीण दशा. गाईगुरे तडफडून मरण पावू लागली. गुरांना ना चारा ना पाणी. नद्या आटल्या. तळी आटली. लोक म्हणत समुद्रसुद्धा आटेल.
अंबर गावापासून कोसावर एक विहीर होती. तिला फक्त पाणी होते. अपरंपार पाणी. मुसळासारखे त्या विहिरीला झरे होते. तेथे माणसांची झुंबड होई. माणसे, गाईगुरे, पशुपक्षी ह्यांची गर्दी तेथे असे. करुणा लांबून घडा भरुन घरी आणी.
एकदा करुणा घडा घेऊन येत होती. वाटेत एक गाय पडली होती. तिला चालवत नव्हते. ती तहानलेली होती. त्या गोमातेने करुणेकडे पाहिले. करुणा कळवळली, ती आपला घडा घेऊन गाईजवळ गेली; परंतु गाईचे तोंड घड्यात जाईना. इतक्यात करुणेला युक्ती सुचली. तिने एक दगड घेऊन हळूच वरचा भाग फोडला आणि रुंद तोंडाचा तो घडा गाईसमोर ठेवला. गाय पाणी प्यायली. शेवटचे पाणी. करुणेकडे प्रेमाने व कृतज्ञतेने पाहात गोमातेने प्राण सोडले !