मीलन 1
शिरीषने घरी येताच हेमाला ती तसबीर दाखविली व तो म्हणाला, ‘ही बघ माझी तसबीर!’
‘कोठून आणलीस, शिरीष?’ तिने विचारले.
‘एका भिकारणीची चोरली, पळवून आणली. आज मी चोर झालो.’
‘शिरीष, असे करु नये?’
‘परंतु मला न विचारता माझे चित्र कोणी काढले? आणि ते का असे वा-यावर टांगून ठेवायचे? जणू फाशी दिलेला. आणले मी काढून.’
‘शिरीष, काही तरी बोलतोस. हे तुझे चित्र पुष्कळ वर्षापूर्वीचे आहे. तू तुझ्या गावी असशील, तेव्हाचे आहे. तुझ्या घऱी होते हे चित्र?’
‘होते.’
‘तेच असेल हे. तुझे आईबाप मेले. घरात कोणी नसेल. तुझे चित्र कोणी तरी लांबविले; परंतु त्या भिकारणीने त्याला माळ का घातली? हे चित्र कोणाचे आहे हे का तिला माहीत होते?’
‘मला नाही माहीत.’
‘शिरीष, ही तसबीर माझ्या महालात लावू. मी तिला रोज हार घालीन.’
अशी पतिपत्नींची बोलणी चालली होती, तो राजाचे बोलावणे आले म्हणून शिरीष निघून गेला. हेमा ती तसबीर मांडीवर घेऊन बसली होती, तो बाहेर ती बाचाबाची झाली. भिकारीण भांडत होती. हेमाने भिकारणीस आत ओढले. करुणेने सर्व हकिकत सांगितली. शिरीष सोडून गेल्यापासूनचा इतिहास तिने सांगितला. हेमा शांतपणे ऐकत होती. मधून मधून सदगतित होत होती.
‘करुणे, आता हे चित्र नको मागू. शिरीषच तुला देते. जिवंत मूर्ती घे. शिरीषने मला हे मागेच का बरे सांगितले नाही? ही हेमा मत्सरी नाही.’
‘हेमा रागावू नको. शिरीष मनाचा कोमल आहे. आपण दोघी भांडू असे त्याला वाटले असेल. जगात सवतीमत्सर फार वाईट. शिवाय येथून येण्याचीही अडचण. माझ्या शिरीषवर रागावू नको.’
‘करुणे, किती थोर मनाची तू! किती तुझी श्रद्धा, किती विश्वास, किती प्रेम! ऊठ चल. मंगल स्नान कर. सुंदर वस्त्रे नेस. अलंकार घाल. शिरीष घरी येईल, त्याचे तू स्वागत कर. मी लपून राहीन. शिरीषची गंमत करु. तो घाबरेल. बिचकेल. पळू लागेल, गंमत करु हो. ऊठ आता.’
करुणा स्नानगृहात गेली. कढत कढत पाणी घेतले. अंगाला उटणी लावली. केसांना सुगंधी तेल लावले. स्नानोत्तर ती रेशमी वस्त्र नेसली. मोत्यांचे हार घातले, प्रसन्नमुखी जणू देवताच ती दिसत होती.