दुःखी करुणा 6
‘कृपा करा दादा, दुःखामुळे मी बोलल्ये. महाराज पोटच्या पोराप्रमाणे प्रजेला जपतात आणि म्हणून तर तुमच्यासमोर मी पदर पसरत्ये. तुम्ही महाराजांचे सत्त्व जाऊ देऊ नका. त्यांच्या नावास कलंक लावू नका. मी तुमची अनाथ मुलगी आहे.’
लावलेले दुकान पुन्हा उघडून करुणेला चार पायल्या धान्य मिळाले. त्यांना ती दुवा देत निघाली. चार पायल्या धान्य मिळाल्यामुळे तिला आनंद झाला होता. तिच्या दुबळ्या पायांत त्या आनंदाने शक्ती आली होती. रस्त्यात अंधार होता; परंतु कर्तव्याचा प्रकाश तिला पथ दाखवीत होता.
परंतु कोण येत आहे ते अंधारातून ? चोर की काय ? होय. तो चोरच होता. त्याने एकदम करुणेच्या डोक्यावरचे पोते ओढले. करुणा चमकली. पोत्याची ओढाताण सुरु झाली. चोर ते घेऊन पळून गेला. करुणेची सारी शक्ती गेली. आता घरी त्या म्हाता-यांना तोंड कसे दाखवायचे ? परंतु ती उठली. अंधारात तशीच निराशेने निघाली. घरी आली. ती दोन पिकली पाने फटकुरावर पडलेली होती.
‘करुणे, मिळाले का काही ?’ सास-याने विचारले. तिने सारी कथा सांगितली. त्या म्हाता-याने सुस्कार सोडले. तिने त्यांना घोट घोट पाणी पाजले. तिही पाणी पिऊन पडली.
दुस-या दिवशी सकाळी ती प्रेमानंदाकडे गेली.
‘काय करुणे, म्हातारी कशी आहेत ?’
‘प्रेमानंद, चार दिवसांत घासभरही अन्न मिळाले नाही. काल मला रात्री धान्य मिळाले. मी येत होते. चोरांनी ते लुटले. मी काय करु ? तुम्ही त्यांचे मित्र. काही मदत करा. तुमच्याजवळ मागायला संकोच वाटतो; परंतु इलाज नाही. माझे प्राण त्यांना खायला घालता आले असते, तर घातले असते; परंतु बोलून काय उपयोग ?’
‘करुणे, हे घे थोडे धान्य. आत खूप कोंडा आहे. तो पाखड. निघतील चार मुठी दाणे. ते त्या म्हाता-यांना शिजवून घाल हो. काळ कठीण आहे खरा. एकमेकांना शक्य तो जगवायचे.’
ते भुसकट घेऊन करुणा घरी आली. पडवीत सूप घेऊन ते भुसकट ती पाखडू लागली. कोंडा उडत होता. दाणा मागे राहात होता. दाणे पाखडता पाख़डता ती गाणे म्हणू लागली.
‘फटक फटक फटक !’
‘सुपाचा आवाज होत आहे. कोंडा उडत आहे. निःसत्त्व क्षुद्र कोंडा. उकिरड्यावर फेकण्याच्या लायकीचा कोंडा.’
‘फटक फटक फटक !’
‘मीही ह्या कोंड्यासारखी आहे. दैव मला पाखडीत आहे. उकिरड्यावर मला फेकीत आहे. मी निराश आहे. मी दुःखी आहे. मी दुबळी आहे, निःसत्त्व आहे. मी कोणालाही नको. आईबाप मला सोडून गेले. पती मला सोडून गेले. सासूसासरे नावे ठेवतात. कोण आहे मला? कोंडा, कोंडा. कोंड्यासारखे माझे जीवन. फुकट फुकट.’
‘फटक फटक फटक !’