शिरीष व हेमा 1
शिरीष व हेमा ह्यांचे लग्न लागले. शिरीष आता प्रधान झाला होता. राहायला मोठा राजवाडा होता. सुखाला तोटा नव्हता. परंतु शिरीष सुखी होता का? आपला पती दुःखी आहे, ही गोष्ट हेमाच्या लक्षात आल्यावाचून राहीली नाही. प्रेमाला ताबडतोब सारे कळते. प्रमाचे क्ष किरण हृदयापर्यंत जाऊ पोचतात व तेथे काय चालले आहे ते त्यांना समजून येते. प्रेमाला जशी नाडी कळते, तशी जगात कुणालाही कळत नाही.
हेमाने एके दिवशी पतीला सर्व विचारण्याचे ठरवले. घोड्याच्या गाडीतून दोघे फिरायला गेली होती. नदीकडील रस्त्याने गाडी जात होती. एके ठिकाणी गाडी थांबवून खाली उतरुन दोघे पायीच निघाली; परंतु कोणी बोलत नव्हते.
‘शिरीष, बोलत रे का नाहीस?’
‘काय रोज उठून बोलायचे तरी?’
‘तुला काही तरी दुःख आहे.’
‘आणि ते काय आहे, ते मला माहीत आहे.’
‘शिरीष, आपण आईबाबांना अंबरगावहून येथे आणू. ती येथे राहातील. त्यांना पुत्राचा उत्कर्ष पाहून अभिमान वाटेल. का नाही तू घेऊन येत?’
‘हेमा, अडचणी आहेत. त्या तुला सांगता येत नाहीत. तू व मी खेड्यातच जाऊ, चल. तू आपल्या वडीलांना गळ घाल. नको ही प्रधानकी, मला माझ्या आईबापांकडे जाऊ दे, ती माझी वाट पाहात असतील, हेमा. तू दूर जाऊ नयेस असे ज्याप्रमाणे तुझ्या आईबापांस वाटते, तसे मी दूर जाऊ नये म्हणून माझ्या आईबापांस नसेल का वाटत? तू तुझ्या आईबापांची एकटी, तसा मीही माझ्या आईबापांचा एकुलता. तू काही कर; पित्याकडून राजाला गळ घालच. माझी प्रधानकी रद्द करव. मला मुक्त कर. मी येथे कैदी आहे, दुःखी आहे.’
‘परंतु सासूबाईंना व मामंजींना इकडे का नाही आणीत...’