मी चोर नाही; तुम्ही चोर आहात 2
यात्रेचा मुख्य दिवस आला. करुणेचे हृदय आशेने उचंबळले होते. आज शिरीष येथे आल्याशिवाय राहाणार नाही. हातात एकतारी घेऊन ती बाहेर पडली. आज माझा देव मला भेटणार असे तिला वाटत होते.
त्या बाजुला सारे भिकारी होते. जो जो येई, तो पै पैसा टाकायला इक़डेही येई. शिरीष इकडे आल्याशिवाय राहाणार नाही, असे करुणेला वाटले. ती त्याच भिका-यांत एके ठिकाणी भजन करीत बसली.
आणि तिने काय केले, ऐका. तिने ते शिरीषचे चित्र काढले. तिने तेथे एक बांबूची काठी पुरली. त्या काठीला तिने ती तसबीर अडकवली. त्या तसबिराला तिने सुंदर घवघवीत हार घातला होता.
हजारो लोक येत जात होते. समाधीवर फुले वाहून जात होते. आईबापांविषयी कृतज्ञता शिकून जात होते. आईबाप मुलांवर प्रेम करावे, असे शिकून जात होते. मुले आईबापांविषयी कृतज्ञ राहावे, असे शिकून जात होती.
‘हेमा, मी एकटाच जातो दर्शनास. आज मी साध्या भिका-याच्या वेषाने बाहेर पडणार आहे. साध्या शिरीषला आईबापांचे आत्मे भेटतील. वैभवात लोळणा-या अहंकारी शिरीषला भेटणार नाहीत. मला नम्र होऊन आईकडे जाऊ दे. तू तुझ्या आईबापांबरोबर जा. मी एकटाच जाईन.’
‘शिरीष, परत ये हो. जाऊ नको वैतागून. तू राजाचा मुख्य मंत्री आहेस. हेमाचा प्राण आहेस. येशील ना परत?’
‘येईन. दरवर्षी मी यात्रेला जातो. गेलो का तुला सोडून?’
‘परंतु भिका-यासारखा आजपर्यंत कधी गेला नाहीस. आपण सारी बरोबर जात असू. खरे की नाही?’
‘परंतु आज एकटाच जातो. रागावू नकोस.’
शिरीष वेष बदलून हळूच बाहेर पडला. अंधार पडला होता. यात्रेत लाखो दीप लागले होते. जणू आकाशातील अनंत तारे पृथ्वीवर अवतरले. करुणेची आशा संपत आली. नाही का येणार शिरीष? येईल. रात्रभर लोक येतच राहाणार आणि मोठे लोक रात्रीसच येतील.
शिरीषचे चित्र वा-यावर नाचत होते. करुणेचे चित्त आशानिराशांवर नाचत होते. हजारो दिव्यांची ज्योती नाचत होत्या. धडपड़णा-या जीवांप्रमाणे नाचत होत्या.