यात्रेकरीण 2
‘करुणे, समाध्या बांधताना तू रात्री बेरात्री रानावनात हिंडत असस. तुला कशाची भीती वाटत नसे. अग, नागोबा व वाघोबा येऊन तुझे काम करतात. देवाची तुझ्यावर कृपा आहे. तुला वाटेत त्रास होणार नाही. नद्या तुला उतार देतील. जंगलातील श्वापदे तुला प्रेम देतील. वाघ वाट दाखवील. दमून तू झोपलीस तर नाग तुझ्यावर फणेचे छत्र धरील. जा, भिऊ नकोस. सती सावित्री पती पाठोपाठ प्रत्यक्ष काळाबरोबर गेली. सतीला भय ना भिती. तू जा. शेवटी सारे चांगले होईल. माझा शिरीष तुझी वाट पाहात असेल. असेल तिचे प्रेम तर येईल, अस मनात म्हणत असेल. तो मोठा प्रधान आहे. तो इकडे आला तर ते बरे नाही दिसणार. तूच जा. तो तुझा स्वीकार करील. तुला राजधानीत कसे वागावे, काय करावे, ते सारे सुचेल. शिरीषच्या मातापित्यांच्या ह्या सुंदर समाध्यांजवळच त्यांच्या मुलाकडे जाण्याचा निश्चय कर.’
‘प्रेमानंद, एकटी जाऊ ?’
‘बरोबर एकतारी घे. गाणी गात जा. यात्रेकरीण होऊन जा. गळ्यात रुद्राक्षांची माळ घाल. धवल वस्त्र परिधान कर. प्राचीन काळातील तपस्विनी, महाश्वेता जणू. बनून जा.’
‘प्रेमानंद, शिरीषचे एक सुंदर चित्र घरी आहे. तुम्हाला माहीत आहे ? तेही बरोबर घेऊन जाईन. त्याचा उपयोग होईल.’
‘होईल, जा. एकतारी व शिरीषची तसबीर घेऊन जा. प्रेमाची यात्रेकरीण होऊन जा. पातिव्रत्याच्या तीर्थयात्रेला नीघ. तुझ्या कर्तव्यमय जीवनाच्या मंदिरावर शेवटचा कळस उभार.’
समाध्यांची पूजा करुन ती निघाली. प्रेमानंद आपल्या शेतावर गेला. करुणा घरी आली. तिने सर्व तयारी केली. घरदार, शेत, मळा, बाग तिने प्रेमानंदाच्या स्वाधीन केली. ‘समाध्यांची पूजा करीत जा,’ असे तिने त्याला सांगितले.
करुणा जाणार, ही बातमी गावभर पसरली. सारा गाव तिच्या दारासमोर जमला. सुवासिनींनी तिला वंदन केले. करुणेने सर्वांना प्रणाम केला. सर्वांचे आशीर्वाद व सदिच्छा घेऊन ती बाहेर पडली. गावाच्या सीमेपर्यंत लोक आले आणि मग मागे वळले. प्रेमानंद आणखीही पुढे गेला.
‘प्रेमानंद, किती येणार तुम्ही? जा आता. जपा. तुम्ही मित्रप्रेमाचे कर्तव्य केलेत. नेहमी मदत केलीत. धीर दिलात. सल्ला दिलात. सत्पंथ दाखवलात. जा, किती याल ?’