मीलन 2
दोघीजणी बोलत होत्या. दोघींनी फलाहार केला. करुणेचे हृदय फुलले होते. आनंद उचंबळाला होता. मध्येच हेमाच्या हाताचे ती प्रेमाने चुंबन घेई. शिरीषचा रथ आला. बाहेर ललकारी झाली. हेमा लपली. तेथे मंचकावर करुणा बसली होती. पवित्र, प्रेमळ, हसतमुख करुणा. शिरीष आला. एकदम आत आला. करुणा उभी राहिली. शिरीष चपापला. आपण घर तर चुकलो नाही, असे त्याला वाटले. तो घाबरला.
‘क्षमा करा हो!’ असे म्हणून तो जाऊ लागला.
‘अपराध्याला क्षमा नाही. अपराध करुन सवरुन आता पळून कोठे चाललात !’
करुणेने शिरीषचा हात धरला. तो निसटून जाऊ लागला.
‘हेमा, हेमा!’ त्याने हाका मारल्या.
‘ओ’ करुन पलंगाखालून हेमा बाहेर आली. ती हसत होती.
‘फजिती, राजाच्या मुख्य प्रधानाची फजिती. शिरीष, पळून काय जातोस ?’
‘हेमा, काही तरी काय बोलतेस? मनुष्याने पापापासून पळावे, परस्त्रीपासून पळावे.’
‘शिरीष, स्वस्त्रीपासून पळणे म्हणजे का पुण्य?’
‘मी तुला कधी सोडले आहे का ?’
‘आणि करुणेला ? करुणेची करुणा तुला अद्याप का येत नाही ? तुझ्यासाठी ती भिकारीण बनली, तरी तुला दया येत नाही ? शिरीष, बघ, ह्या सुंदर स्त्रीकडे बघ. माझ्या आज्ञेने तिचा मुखचंद्र पाहा. बघ पटते का ओळख ?’
‘करुणा, माझी करुणा!’
शिरीषने करुणेचे पाय धरले. करुणा लाजली.
‘हे काय शिरीष ? माझे पाय दुखत नाहीत हो. तुझेच यात्रेत हिंडून दमले असतील. भिकारणीला भेटायला भिकारी होऊन आला होतास वाटते ? शिरीष, बस. माझे सारे श्रम आज सफल झाले.’