*राजधानीत 2
विद्यापिठाच्या वसतीगृहात राज्यातील वेचक तरुणांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांचा विशिष्ट अभ्यास चालला होता. आदित्यनारायण मधून मधून ह्या वसतीगृहात येत व संशोधन करीत असत.
आज ते वसतीगृहात आले, तो काही तरी तेथे गडबड होती.
‘काय आहे ? काय आहे ?’ आदित्यनारायण विचारत होते.
‘रस्त्यात एक लहान मूल होते. तिक़डून एक मस्त हेला शिंगे उगारुन येत होता; परंतु येथील एक विद्यार्थी, शिरीष, विजेप्रमाणे धावत गेला व त्या मुलाला त्याने वाचवले. सारे त्याची स्तुती करीत आहेत.’ चालक म्हणाले.
‘कोठे आहे तो तरुण ?’
‘तो पाहा.’
शिरीषला बोलावण्यात आले. सुंदर सुकुमार शिरीष तेथे नम्रपणे उभा होता. तो सुकुमार असून वीर होता. फुलाप्रमाणे दिसत होता, परंतु वज्रवृत्तीचाही होता.
‘शाबास तुमची. महाराजांच्या कानांवर घातले पाहिजे.’ आदित्यनारायण म्हणाले.
‘महाराजांच्या कानांवर ह्यांची कीर्ती आधीच गेली आहे. ज्यांना खास दूत पाठवून आणण्यात आले, तेच हे शिरीष !’ चालकांनी सांगितले.
आदित्यनारायण निघून गेले आणि थोड्या वेळाने त्यांची मुलगी हेमा त्या वसतीगृहात आली. सुवर्णासारखी तिची कांती होती. रेशमी बहुमोल वस्त्र ती नेसली होती. मोत्यांचे अलंकार तिच्या अंगावर होते. सारे तरुण तिच्याकडे पाहू लागले.
चालक समोर आले.
‘माझे बाबा इकडे आले होते ना ?’ तिने विचारले.
‘ते तर गेले.’
‘इतक्यात कसे गेले ? ह्या तरुणांची परीक्षा घ्यायला ते आले होते ना ?’
‘तसे काही बोलले नाहीत.’
‘बरे, मी जात्ये.’
‘थांबा. नोकर गेला आहे. माळ्याकडून फुले आणायला गेला आहे. फुलांची भेट घेऊन जा.’