शिरीष 2
करुणा त्या मुलीच नाव. किती गोड नाव. खरोखरच ती मूर्तीमंत करुणा होती. ती गाईगुरांना मारीत नसे. पाखरांस दाणे टाकील, मांजरास दहीभात घालील. करुणा सर्वांची करुणा करी; तिची करुणा कोण करणार? तिची दया कोणाला येणार? नाही का तिचे लग्न होणार? नाही का कोणी योग्य वर मिळणार? नाही का शिऱीष मिळणार? करुणेचे चुलत्याजवळचे बोलणे सर्वत्र पसरले. शिरीषच्याही कानावर आले आणि खरेच त्याने करुणेशी लग्न लावले. सुखदेव व सावित्री ह्यांना वाटत होते की, एखाद्या श्रीमंताची मुलगी आपल्या मुलाला मिळावी; परंतु मुलाच्या इच्छेविरुद्ध ती गेली नाहीत.
शिरीष व करुणा परस्परांना अनुरुप होती. त्यांच्या लहानशा संसारात आता आनंदाला तोटा नव्हता. शिरीषबरोबर करुणाही शेतात काम करी. फुलांना पाणी घाली. ती पहाटे उठे. गोड गोड ओव्या म्हणत जात्यावर दळी, सासू-सास-यांची ती सेवा करी. त्यांची धुणी धुवी. त्यांचे पाय चेपी. गोड बोलून पतीलाही सुखवी, हसवी.
दरवर्षी आपल्या विवाहाचा वाढदिवस शिरीष व करुणा साजरा करीत. वसंत ऋतीत त्यांचे लग्न झाले होते. वाढदिवस वसंत ऋतूत येई. सारी सृष्टी त्या वेळेस सुंदर असे. वृक्षवेलींना नवीन पल्लव फुटलेले असत. झाडांना मोहोर असे. पक्षी गो़ड गाणी गात असत. प्रसन्न वारा वाहात असे आणि अशा प्रसन्न वातावरणात हा विवाह-वाढदिवस साजरा होत असे.
अद्याप त्यांना मूलबाळ झाले नव्हते. सुखदेव व सावित्री ह्यांना नातवाचे तोंड कधी दिसेल असे झाले होते.
‘बाबा, तुम्हाला मी म्हातारपणी झालो तसे आम्हालाही म्हातारपणी मूल होईल!’ शिरीष हसून म्हणे.
‘परंतु त्या वेळेस आम्ही नसू.’
‘सोमेश्वराच्या यात्रेत बाळाला घेऊन आम्ही येऊ. तेथे तुमचे आत्मे बाळाला पाहातील.’
‘सोमेश्वराला मला कधीही जाता आले नाही. किती तरी लांब. तू तरी कसा जाशील?’
‘इच्छा असली म्हणजे जाता येईल.’ असे संवाद चालत.
परंतु यशोधर राजाच्या नवीन आज्ञेची राज्यात सर्वत्र दवंडी देण्यात आली. सर्व बुद्धीमान तरुणांची यादी करण्याचे ठरले. आईबाप आपापल्या हुषार मुलांची नावे आनंदाने देऊ लागले.
‘सुखदेव, तुमच्या शिरीषचे नाव दिलेत की नाही? त्याच्यासारखा हुषार कोण आहे? त्याच्यासारखा गुणी कोण आहे? सर्व राज्यात तो पहिला येईल. राजाचा मु्ख्य प्रधान होईल. तुमच्या भाग्याला मग काय तोटा?’