सचिंत शिरीष 1
शिरीषची सर्वत्र स्तुती होत होती. दुष्काळात त्याने फारच मेहनत घेतली. राजा यशोधराने खास दरबार भरवून शिरीषचा सन्मान केला. अधिकारी असावेत तर असे असावेत, राजा म्हणाला.
आदित्यनारायण आता वृद्ध झाले होते. त्यांनी आता मंत्रीपद सोडण्याचे ठरविले. एके दिवशी ते राजाकडे गेले व प्रणाम करुन म्हणाले, ‘महाराज, आता काम होत नाही. नवीन तरुण मंडळीस वाव द्यावा. मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मोकळे करावे.’
‘आदित्यनारायण, तुम्ही पुष्कळ वर्षे सेवा केलीत. तुम्हाला आता विश्रांती हवी. मी तुम्हाला मुक्त करतो; परंतु आम्हाला वेळप्रसंगी पोक्त सल्लामसलत देत जा. तुम्ही अनुभवी थोर माणसे.’
‘मी केव्हाही सेवेस सिद्धच आहे.’
‘परंतु तुमची जागा कोणाला द्यावी ? शिरीषांना दिली तर बरे होईल का ?’
‘महाराज, शिरीष माझे जावई. तेव्हा मी काय सांगू ? परंतु मी खरेच सांगतो, त्याच्यासारखा कर्तव्यदक्ष मंत्री मिळणार नाही. रात्रंदिवस ते प्रजेची चिंता वाहातात. दुष्काळात ते एकदाच खात. एकदा हेमाने घरात काही गोड केले; परंतु ते रागावले. त्यांनी स्पर्श केला नाही. ‘लोक अन्नान्न करुन मरत असता मी का गोड खात बसू ? आधी प्रजा पोटभर जेवू दे. मग मी जेवेन,’ असे ते म्हणाले. असा मंत्री कोठे मिळणार ?’
‘खरेच आहे. शिरीष म्हणजे एक रत्न आहे. त्यांनाच मी मुख्य प्रधान करतो.’
काही दिवसांनी शिरीषला पंतप्रधानकीची वस्त्रे मिळाली. मोठा सत्कार झाला. राजधानीतही अनेक ठिकाणी सत्कार झाले; परंतु शिरीषला त्याचे काही वाटले नाही. तो नेहमीप्रमाणे गंभीर व उदास असे.
‘शिरीष, तुम्ही मुख्य मंत्री झालेत म्हणून सा-या जगाला आनंद होत आहे, परंतु तुम्ही का दुःखी ? तुम्ही माझ्याजवळ मोकळेपणाने वागत नाही. मी का वाईट आहे ? काय माझा अपराध ? सांगा ना !’
‘काय सांगू हेमा! आईबापांची आठवण येते.’
‘मग त्यांना तुम्ही येथे आणीत का नाही! त्यांना भेटायला का जात नाही? मी इतकी वर्षे सांगत आहे; परंतु तुमचा हट्ट कायम. येता भेटायला ? घेता रजा? आपण दोघे जाऊ.’