यात्रेकरीण 3
‘शिरीषला प्रेमपूर्वक प्रणाम सांगा. म्हणावे, जन्मग्रामाला एकदा भेट दे.’
‘सांगेन त्यांना घेऊन येईन. राजाजवळ वर मागेन.’
प्रेमानंद परतला. करुणा करुणापर अभंग आळवीत निघाली. एकतारीच्या नादावर ती गात होती. चालण्याचे श्रम तिला गाणी म्हणायला सांगत.
मंदिरात ती स्वयंपाक करी. एक भाग गाईला काढून ठेवी, बाकीचे जेवे. ‘शिरीष, हा शेवटचा तुझा हो घास,’ असे उठताना म्हणे. मंदिरातील ओवरीत ती भोजन करीत बसे. जाणारे येणारे ऐकत. भक्तिमय होऊन माघारे जात.
एकदा एका मोठ्या नदीतून ती नावेत बसून जात होती; परंतु नाव धारेत सापडली. नावाडी नवशिके होते ! लोक घाबरले.
‘बाई, तुमच्या देवाला तरी आळवा!’ लोक म्हणाले.
‘माझी कोठे आहे पुण्याई?’ करुणा म्हणाली.
‘म्हणा तर खरा अभंग!’ कोणी आग्रह केला आणि करुणेने धावा म्हटला.
‘देवा, धाव रे धाव. आम्ही नाव लोटली आहे. तू सुकाणू हातात घे. तू नसशील तर आम्ही मरु. तू असशील तर तरु. ये, ये, ये.’
आम्ही अभिमान टाकला आहे. आळस झाडला आहे. आम्ही भांडणे मिटविली आहेत. स्पर्धा थांबविली आहे. आम्ही सारे वल्ही मारीत आहोत. एकोप्याने कार्य करीत आहोत. तुझा आशिर्वाद दे. तू मार्ग दाखव. ये, ये, ये.
वारा जोराचा आहे. प्रवाह जोराचा आहे. आम्ही पराकाष्ठा करीत आहोत. प्रभू, तुझी कष्टाळू लेकरे. अंत नको पाहू. ये, ये, ये.
तो पाहा प्रभू आला. त्याने सुकाणू हाती घेतले. वल्हवणा-यांना स्फूर्ती आली धारेतून नाव बाहेर पडली. आले, तीर आले. प्रभूची कृपा झाल्यावर काय अवश्य आहे ? म्हणून प्रयत्न करताना त्याला हाक मारा. त्याला विसरु नका. देवाला विसराल, तर फसाल. नावाड्यांनो ! त्याला आळवाल व आठवाल तर तराल.श्रद्धेचा विजय असो.