Android app on Google Play

 

अर्जुन आणि कर्ण

 


महाभारताच्या युद्धात सूतपुत्र कर्णाचा आरामात वध केल्याने युद्धानंतर अर्जुनाला खूप गर्व झाला. त्याने ही गोष्ट कृष्णासमोर बोलून दाखवली तेव्हा कृष्ण हसू लागला. काही वेळाने कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की युद्धात जे झालं ते तुला समजलेलं दिसत नाही. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की : कर्णाने आपले अपराजित कवच आणि कुंडले, जी जन्मजात त्याच्या शरीराला जोडलेली होती, ते ब्राम्हणाच्या रूपातील इंद्राला देऊन टाकले, कारण इंद्राला माहिती होते की असे केल्याशिवाय कर्णाला पराभूत करणे अशक्य आहे. त्यामुळे आपला पुत्र अर्जुन याच्या सुरक्षे साठी इंद्राने कर्णाकडून कवच - कुंडले मागून घेतली आणि महारथी कर्ण दानशूर होता, त्यामुळे त्याने काही विचार न करता त्या गोष्टी इंद्राला दिल्या. इंद्राने त्याला विचारलं की, "मी इंद्र आहे हे माहीत असूनही तू मला कवच कुंडले का दिलीस? " यावर कर्णाने उत्तर दिले की सूर्य पूजेच्या वेळी जर तुम्ही माझे प्राणही मागितले असते तर मी तेही दिले असते." या उत्तराने इंद्र खजील झाला आणि त्याने कर्णाला अमोघ शक्ती दिली ज्यामुळे तो कोणा एका व्यक्तीला असफल न होता मारू शकेल. परंतु त्यानंतर ती शक्ती इंद्राकडे परत येईल. ही शक्ती तीच होती जी कृष्णाने घटोत्कचावर वापरायला भाग पाडले, ज्यामुळे कर्णाच्या विजयाची शेवटची अशाही संपुष्टात आली. या परिस्थितीत कर्णाचा सामना अर्जुनाशी झाला. याशिवाय कर्णावर काही शापही होते. पाहिला शाप त्याचे गुरु परशुरामांनी दिला होता कारण त्याने त्यांच्याकडून हे सांगून शिक्षण घेतले की तो एक ब्राम्हण आहे. त्यामुळे जेव्हा भगवान परशुरामांना या खोट्या बद्दल माहिती पडले तेव्हा त्यांनी कर्णाला शाप दिला की जेव्हा तू आपल्या सर्वात कठीण युद्धात असशील, आणि जेव्हा तुला या ज्ञानाची सर्वाधिक गरज असेल, तेव्हा तुला या ज्ञानातील काहीच आठवणार नाही. त्यामुळेच कर्ण आपल्या मृत्यू च्या दिवशी ब्रम्हास्त्र आणि इतर अस्त्रांच्या वापराचा विधी विसरून गेला. दुसरा शाप होता: एकदा कर्ण शिकार करत होता आणि चुकून त्याने एका ब्राम्हणाची गाय आणि तिचं वासरू मारलं. त्या ब्राम्हणाने शाप दिला की युद्धात कठीण वेळी त्याच्या रथाचं चाक धसेल (जमिनीत रुतेल) आणि त्याची आवक देखील बंद होईल. त्याचा सारथी शल्य त्याच वेळी तिथून निघून गेला आणि त्याच्या रथाचं चाक जमिनीत धसले होते तेव्हाच, कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. कर्ण दानशूर होता. त्याच्या सवयी सभ्यता, सज्जनता आणि दयेने एवढ्या परिपूर्ण होत्या की मृत्यू त्याच्या आसपास फिरकू शकला नसता. परंतु कृष्णाने पुन्हा खेळी खेळली. एका गरीब ब्राम्हणाचा वेश घेऊन त्याने युद्धभूमीवर जखमी कर्णाकडून त्याच्या सर्व चांगल्या कर्मांचे फळ दान म्हणून मागून घेतले. दानशूर असल्यामुळे कर्णाने त्याची ही मागणी चटकन पूर्ण केली. त्याच्या पुण्याचं सुरक्षाकवच त्याच्यापासून दूर झालं आणि अर्जुनाला त्याला मारण्यात अडचण आली नाही. शेवटी कृष्ण म्हणाला : तूच विचार कर आणि निर्णय घे की तुमच्या दोघात श्रेष्ठ योद्धा कोण आहे, तू - अर्जुन - जो माझ्या संरक्षणात आणि माझ्या सल्ल्याने युद्ध खेळत होता की तो कर्ण - जो आपलं फुटकं नशीब घेऊन युद्धात सामील झाला होता. हे ऐकून अर्जुनाला आपली चूक उमगली आणि त्याने मान्य केलं की कर्ण आपल्यापेक्षा महान योद्धा होता.