Android app on Google Play

 

पाच सोन्याचे बाण

 जेव्हा कौरवांची युद्धात स्पष्ट पिछेहाट होऊ लागली तेव्हा एके रात्री दुर्योधन भीष्मांना भेटण्यास गेला आणि त्याने त्यांच्यावर आरोप केला की पांडवांवरील प्रेमापोटी ते पूर्ण मनापासून युद्ध लढत नाहीयेत. यावर अत्यंत क्रोधीत होऊन भीष्मांनी पाच सोन्याचे बाण उचलून त्यावर मंत्र पढून सांगितले की या पाच बाणांनी उद्या ते पाच पांडवांचा वध करतील. दुर्योधनाचा भीष्मांच्या या वक्तव्यावर विश्वास नव्हता, त्यामुळे त्याने भिष्मांकडे ते पाच सुवर्णतीर मागितले आणि सांगितलं की तो त्यांना सुरक्षित ठेवू इच्छितो आणि पुढच्या दिवशी परत करेल.

या अगोदर
महाभारत युद्धाच्या अनेक वर्ष आधी पांडव जंगलात राहत होते. दुर्योधनाने आपले शिबीर जिथे पांडव वास करत होते त्याच्या विरुद्ध दिशेला बनवले. एकदा दुर्योधन तलावात स्नान करत असताना गंधर्व धरतीवर आले. दुर्योधनाने त्यांच्याशी लढाई केली परंतु तो त्यात हरला. गंधर्वांनी दुर्योधनाला बंदी बनवले. अर्जुनाने येऊन दुर्योधनाचे प्राण वाचवले. दुर्योधन खजील झाला, पण तो क्षत्रिय होता, म्हणून त्याने अर्जुनाला वर मागण्यास सांगितले. अर्जुनाने सांगितले की योग्य वेळ आल्यावर तो आपला वर मागेल.

अर्जुनाने आपला वर मागितला
त्याच रात्री कृष्णाने अर्जुनाला त्या अपूर्ण वरची आठवण करून दिली आणि त्याला सांगितलं की दुर्योधानाकडून ते ५ सोन्याचे बाण मागून घे. जेव्हा अर्जुनाने ते बाण मागितले तेव्हा दुर्योधन हैराण झाला, परंतु तो क्षत्रिय असल्यामुळे त्याला त्याचे वचन पाळावे लागले. त्याने अर्जुनाला विचारले की सोन्याच्या बाणासंबंधी त्याला कोणी सांगितले तेव्हा अर्जुन म्हणाला की कृष्णा शिवाय हे कोण सांगू शकेल..? दुर्योधन पुन्हा पाच सोन्याचे तीर मागण्यासाठी भीष्मांना जाऊन भेटला, तेव्हा हसून भीष्मांनी सांगितले की आता ती गोष्ट शक्य नाही.