सोन्यामारुति 84
शिक्षक : आपली मर्जी! मुलांच्या मनाचा मी कोंडमारा करणार नाहीं. त्यांचा विकास व्हावा अशी मला इच्छा आहे. आणि मी माझा तरी किती कोंडमारा करून घेऊं?
चालक : ठीक. आतां तुम्ही जा. मला नीट विचार करावा लागेल. शेवटीं ही थोर संस्था हें माझें ध्येय आहे. ही सुंदर दगडी इमारत का ओस पाडूं ?
शिक्षक : त्या दगडी इमारतींत राम नसेल तर ती ओस पडल्यासारखीच आहे. शरीर भलें दांडगें असेल, परंतु त्या शरीरांत प्राण नसेल, चैतन्य नसेल, तर तें शरीर काय कामाचें ? तें शरीर पुरणें किंवा जाळणें एवढाच मार्ग राहतो. तसेंच ठेवणें म्हणजे रोग उत्पन्न करणें होय.
चालक : ही सुंदर पाषाणमय प्रासादतुल्य इमारत उभारण्यासाठीं कितीकांकडे नाकें घासावीं लागलीं, तें तुम्हांला काय माहीत ?
शिक्षक : म्हणून मुलांचीहि नाकें तेथें घांसली जाणार! मुलांच्या माना तुम्ही उंच होऊं देणार नाहीं, त्यांचीं मनें उंच होऊं देणार नाहीं. उंच इमारतींतील मुलांचीं मनें मात्र क्षुद्र होणार! याच्याऐवजीं झोपड्यांतून शिक्षण दिलें असतेंत, परंतु मुलांची मनें उंच केली असतील तर तें किती छान झालें असतें !
चालक : परंतु विद्यापीठ दगडी इमारत बघतें. इमारतीची शाश्वति बघतें. तुम्हांला कांही राजकारण समजत नाही. तुम्ही तरुण आकाशांत उडतां. परंतु व्यवहारांत जमिनीवर राहावें लागतें. बरें, तुम्ही जा. तुम्हांला सावध करीत आहें.
वसंता : खालीं मान घालून विचारे गेले.
वेदपुरूष : त्यांच्या डोळ्यांतून पाणी येत आहे.
वसंता : कां बरें ?
वेदपुरुष : त्यांच्या हृदयमंदिरांतील सोन्यामारुतीचें उड्डाण बंद करण्यात येत आहे.
वसंता : तीं पहां मुलें त्यांना प्रश्न विचारीत आहेत.
एक विघार्थी : सर, काय झालें ?
शिक्षक : कांही नाही.
दुसरा विघार्थी : सर तुमचें तोंड खिन्न दिसतें आहे.
तिसरा विघार्थी : आज आम्हांला कांहीं वाचून दाखवाल ? हरिजनांमध्यें महात्माजींचे फारच सुंदर प्रवचन आलें आहे, असे तुम्ही म्हणत होतेत. तें आणलें आहे तुम्ही ?