सोन्यामारुति 22
बन्सी : परंतु सारे सामील होतील तेव्हां ना ?
गंगाराम : प्रत्येक जण असेंच म्हणत बसेल तर कांहींच होणार नाहीं. धडपड केली पाहिले.
दगडू : गंगाराम! तुम्हांला काढून टाकणार आहेत असें ऐकतों ?
गंगाराम : अशी अफवा आहे. परंतु शेटजी थंड हवेवर जाण्यापूर्वी याचा सोक्षमोक्ष आम्ही लावणार आहोंत.
हरि : तो कसा काय ?
गंगाराम : उद्यां सायंकाळी म्हणे मोठी सभा आहे.
बन्सी : कशाची रे ?
गंगाराम : सोन्यामारुतीबद्दल. शेटजी अध्यक्ष होणार आहेत. त्या सभेंत जाऊन एकदम आम्ही उभे राहाणार आहोंत. प्लॅटफॉर्मवर जाऊन निकाल मागणार आहोंत.
दगडू : दंगल होईल.
गंगाराम : दंगलींतून मंगल बाहेर येतें. या सर्व धर्ममार्तंडांचा दंभ जगासमोर उघडा केला पाहिजे. गरिबांना पिळणारे म्हणे धर्मवीर! वाहवारे धर्मवीर! सारा लफंग्याचा बाजार आहे. यांची हृदय फाडलीं तर नुसता नरक आढळेल तेथें !
बन्सी : उद्यां आम्ही पण सभेला येऊं.
हरि : सभेंत लाल बावटा आणणार आहांत वाटतें ?
गंगाराम : तो तर आमचा प्राण. लाल बावटा म्हणजे आमची आशा, आमची श्रध्दा, आमची स्फूर्ति, आमची ज्योति! लाल बावटा म्हणजे निर्भयता. लाल बावटा म्हणजे लाखों हुतात्म्यांचें पवित्र स्मरण! लाल बावटा म्हणजे माणुसकी, लाल बावटा म्हणजे समता. लाल बावट्याहून पवित्र असें दुसरें काय आहे ?