सोन्यामारुति 15
वसंता : परंतु तो बिभीषणांना सन्मानील. सोन्याच्या लंकेंतील सर्वांनाच जाळणार नाहीं, पोळणार नाहीं.
वेदपुरुष : जे मारुतीच्या बाजूला येतील, सोन्यामारुतीच्या बाजूला येतील ते वांचतील. बाकीचे समुद्रांत फेंकले जातील.
वसंता : म्हणून माझे मित्र सोन्यामारुतीच्या पूजेला निघाले वाटतें ? सर्वत्र असणारे सोन्यामारुती! मलाहि निघूं दे त्यांच्या पूजेला. दाखव ते मला.
वेदपुरुष : मी तुला हा अनंत सोन्यामारुति दाखवीन. तूं चारपांच दिवस माझ्याबरोबर हिंड. एकदां दृष्टि आली म्हणजे झालें. मग माझी जरूर पडणार नाहीं. मग हे सांदीकोपर्यांतील सोन्यामारुती शोधावयास तुला जड जाणार नाहीं. तूं आपण होऊन त्यांना ओळखून त्यांच्या सेवेला धांवशील. हे सोन्यामारुती हंसतात, बोलतात. हे फार प्रेमळ असतात. परंतु रागावले म्हणजें अरे बापरे! मग विश्वांतील कोणतीहि सत्ता त्यांच्यापुढे टिकत नाहीं. वसंता! या अनन्त सोन्यामारुतींचा तूं खरा उपासक हो. या जिवंत चैतन्यमय सोन्यामारुतीच्या सेवेला जा. तेथें घंटा वाजव. सर्वांना तेथें पूजेला बोलव. नगारे तेथें वाजवूं देणार नाहींत. सत्याग्रह कर. बलिदान कर.
वसंता : चला, दाखवा मला तीं मंदिरें. तेंथे मी भेरी वाजवीन, शिंगें फुंकीन. या अनन्त सोन्यामारुतींच्या पूजेला सर्व भावांबहिणींस मी हांक मारीन. मला तेथें जर कोणी नगारे वाजवूं देणार नाहीं, तर मी पळणार नाहीं. माझें रक्त मी सांडीन.
वेदपुरुष : त्या रक्ताने झेंडा रंगेल. अधिक तेजस्वी तो दिसेल. लाखों लोकांच्या पवित्र रक्तानें तो झेंडा रंगलेला आहे. लाल झेंडा! सोन्यामारुतीच्या लाखों उपासकांनीं स्वरक्तानें तो झेंडा निर्माण केलेला आहे. तो लाल झेंडा म्हणजे तीं रक्ताचीं आंतडीं आहेत. ते महान् बलिदान आहे. अनन्त सोन्यामारुतींसमोरील अनन्त बलिदान !
चल, बेटा, चल. दाखवतों तुला तो सोन्यामारुति.
वसंता : चला. सोन्यामारुती की जय! अनन्त सोन्यामारुती की जय! रक्तध्वजाच्या सोन्यामारुतीचा जय !