सोन्यामारुति 52
आई : हा हा !
वेदपुरुष : त्या भावानें आई नेली. बकोटी धरुन नेली.
वसंता : तो पहा दु:खी जीव गजाजवळ उभा आहे! अरेरे! काय ही क्रूर मानवी नीति !
वेदपुरुष : तो शिपाई त्याला विडी देत आहे.
वसंता : परवानगी असते का ?
वेदपुरुष : नसते. शिपायाची कृपा !
वसंता : हा समुद्राच्या गर्जनेसारखा कसला आवाज येत आहे?
वेदपुरुष : चक्कीचा आवाज.
वसंता : चला पाहूं.
वेदपुरुष : चाळणीवरचे लोक पहा.
वसंता : पिठानें त्यांची तोंडें भरलीं आहेत. नाक गुदमरून गेलें असेल! कशा चक्क्या फिरत आहेत. त्यांच्या अंगांतून धर्मधारा वहात आहेत.
वॉर्डर : थोडें थोडें दळा. घाबरूं नका.
कैदी : मला तूं येथें सांभाळ. मीं तुला छळलें. सावकारी करतांना तुझ्या घरादाराचा धुव्वा उडवला. तुला खायला ठेवलें नाहीं. पोटासाठीं तूं चोरी केलीस कृष्णा! माझ्यामुळें तुला ह्या तुरुंगांत यावें लागलें. तुझीं मुलेंबाळें तुझी वाट पहात असतील. मी बँकेच्या खटल्यांत सांपडलों. ही सजा कशी पार पडेल ?
कृष्णा वॉर्डर : आतां मागचें नका आठवूं. मागचें चांगलें तें आठवूं. तुमच्या वडिलांच्या वेळेपासून आमचा घरोबा. अपिलांत सुटाल. मी येथें वॉर्डर आहें तों चिंता नका करूं. किती झालें तरी तुम्ही माझे धनी.