सोन्यामारुति 68
वसंता : महात्माजी इतर वर्गांचाहि विचार करितात !
वेदपुरुष : इतरांनी चैनींत रहावें असें कांहीं त्यांना वाटत नाहीं.
वसंता : ते जमीनदारी ठेवूं पाहतात.
वेदपुरुष : त्यांचा तो आशावाद आहे. तुम्हांला जर त्यांची श्रध्दा व आशा नसेल तर तुम्ही तुमचें ध्येय घेऊन जाऊं शकतां. कोणालाहि न दुखवतां कांहींहि करतां येणार नाहीं. गीतेंत म्हणूनच सांगितलें आहे कीं ''दोष सर्वचि कर्मांत राहे अग्नींत धूर तो ।'' निर्दोष कर्म जगांत शक्य नाहीं. कमींत कमी दोष कर्मांत येतील एवढेंच माणसानें पहावें. गांधी कमींत कमी दोष आणूं पहातात.
वसंता : परंतु लाखोंची हायहाय त्यामुळें दूर होणे कालावधीवर पडतें. गरिबांनीं आणखी किती दिवस मनुष्य सुधारेल म्हणून वाट पहावी ?
वेदपुरुष : समजूं शकतों तुझें मन मी. शेवटीं जे योग्य वाटेल तें हातीं घ्या. त्या ध्येयाचे भक्त व्हा. मारुतींने रावणाला मारणार्या रामाला खांद्यावर घेतलें. त्याचप्रमाणें ध्येयाच्या रामाला डोक्यावर घ्या. ध्येयाला खांद्यावर घ्या, कडेवर घ्या, पोटाशीं घ्या, हातांत घ्या. अंतर्बाह्य ध्येयरूप व्हा. तें तुमच्या ज्ञानेश्वरींत आहे ना?
जयांचिये वाचे माझेचि आलाप । दृष्टि भोगी माझेंचि रूप ॥
ओठावर ध्येय, डोळयांसमारे ध्येय, कानांत ध्येय, अशा रीतींनें ध्येयानें नटा. जीवनांत ध्येय भरूं दे.
अंदर राम बाहिर राम
जहां देखो वहां राम हि राम ॥
गुरुकृपांजन पायो
पायो मै रे भाई
राम बिना कछु जानत नाही ॥ गुरु ॥
निर्मळ दृष्टि आल्यावर जिकडे तिकडे रामच राम! जिकडे तिकडे ध्येयच ध्येय !