सोन्यामारुति 47
वेदपुरूष : हो.
वसंता : कोठें आहे ती जागा ?
वेदपुरूष : ती पहा तिकडे. लाल रंगाच्या दरवाजाच्या आंत. चल तेथें जाऊं.
वसंता : आपण भीषण मृत्यूजवळ उभे आहोंत असें वाटत आहे.
वेदपुरूष : तेथें त्या दुर्दैवी प्राण्याला उभें करतात. खाडकन् आवाज होऊन तो खालीं जातो! मिनिटभर चैतन्य धडपडतें. ती बारीक दोरी गळ्याला मिठी मारते.
वसंता : हा रानटीपणा नाहीं का ?
वेदपुरूष : हें का सांगायला हवें ? खून करणारा भावनेच्या एका निशेंत खून करतो. परंतु समाज शांतपणें त्या निशा उतरलेल्या माणासाचा खून करीत असतो! जो गुन्हा गुन्हेगार भावनेच्या भरांत करतो, तोच गुन्हा समाज शांतपणें करतो. जीवाची हत्या करावयास आपणांस अधिकार नाहीं. एकानें हत्या केली. त्यानें पाप केलें. तेंच समाजानेंहि करावें हें केवढें आश्चर्य ? मनुष्याला फांशी दिल्यानें त्याच्या सुधारणेची सारी आशा आपण धुळींत मिळवीत असतों. आपण नास्तिक होऊन त्याचा वध करतों.
वसंता : फांशी कोण देतो ?
वेदपुरुष : मांग देतो. कधीं कधीं तुरूंगांत आलेल्या खुनी माणसाकडे तें काम देण्यांत येतें !
वसंता : मग तो खुनी मनुष्य अधिकच क्रूर होईल. दुसर्यांना मारण्यांत तो अधिकच निर्ढावेल.
वेदपुरुष : मग फांशीबद्दल त्याला पांच रूपये किंवा कांही मिळत असतें. जेलर, सुपरिंटेंडेंट सर्वांनाच प्रत्येक फांशीबद्दल बक्षिस मिळत असतें! दु:खी जीवाचे प्राण जात असतात आणि त्याला फांशी देण्यार्यांना पैसे मिळत असतात. मागें एक खुनी मनुष्य हंसतच म्हणाला, ''फांशीचे अडीचशें रुपये मी जातांना घेऊन जाईन.'' पन्नास माणसांच्या गळ्याला त्यानें व्यवस्थितपणें फांस लाविला होता!
वसंता : तुरुंग हा सुधारण्यासाठीं ना आहे ?
वेदपुरुष : छळानें मनुष्य सुधारत नाहीं. तो अधिकच निराश व द्वेषी होतो. प्रेमानें प्रेम वाढतें.
वसंता : तो मनुष्य काय करीत आहे ?
वेदपुरुष : फटके मारण्याची मंगल कला तो शिकत आहे.
वसंता : केवढी आहे ही चिंध्यांची भयंकर आकृति! तिकाटण्याला ती आकृति बांधलेली आहे. मनुष्याला असेंच बांधतात का ?
वेदपुरुष : हो, एकाच ठिकाणीं सारख्याच वेगानें फटका बसला पाहिजे वेत पाण्यांत भिजत घालतात. म्हणजे तो कातडींत लौकर घुसतो व मांस पटकन् उटतें. पहा तो कसा धांवत येत आहे. धन्य कला!