सोन्यामारुति 43
वसंता : किती छान अभंग आहे !
वेदपुरूष : हा कोणत्या गाथेमधला, माहीत आहे का ?
वसंता : कोणत्या बरें ?
वेदपुरूष : या मुलाच्याच गाथेंतील.
वसंता : हा का कवि आहे ?
वेदपुरूष : होय. त्याचा बाप वारकरी आहे. शेंकडों त्याला पाठ येत आहेत. या मुलाचें नांव ग्यानबा.
वसंता : खरोखरच मग ग्यानबा आहे म्हणायचा.
वेदपुरूष : जगाला अज्ञात ग्यानबा. तुमच्या मासिकांतून प्रेमाच्या रद्दड कविता शब्दांच्या प्राणघेण्या दगडांच्या राशींतून बाहेर पडत असतात; परंतु हे हृदयाचे, अनुभवाचे अमोल बोल, कोण छापणार! कोण ऐकणार ? हे अभंग कोण गाऊन दाखवील ? कोण टाळ्या मारील ?
वसंता : त्यानें विठीला पाणी आणलें आहे.
विठी : ग्यानबा! आतां मरावेंसें वाटतें.
ग्यानबा : असें म्हणूं नये. हें पाणी पी.
विठी : तूं थोडी भाकर खा.
ग्यानबा : कोणीं दिली भाकर ?
विठी : वाघ्यानें.
ग्यानबा : होय रे वाघ्या ? आपल्यासाठीं देवानें वाघ्याचा अवतार घेतला आणि आपण का मरायचें ? वाघ्याला किती वाईट वाटेल ?
विठी : तूं आज काय खाल्लेंस ?
ग्यानबा : अजून खाल्लें नाहीं. परंतु चिंचेचा पाला आणला आहे. चल घरीं. अशी नको येथें पडूं. तुझें लेंकरूं मी घेतों.