सोन्यामारुति 57
चौथें दर्शन
वसंता : वेदपुरुषा! आतां हे अदृश्य स्वरूप पुरें झाले. आपण लोकांजवळ बोलूं, बसूं; त्यांच्याजवळ चर्चा करूं.
वेदपुरुष : एकाच स्थितीचा मनुष्याला कंटाळा येतो. तूं म्हणशील तसें. हें घे तुझें पहिलें रूप.
वसंता : मी आतां कसा दिसतो !
वेदपुरुष : फार गोड दिसतोस ?
वसंता : आपण आगगाडींतून कोठें तरी जाऊं या.
वेदपुरुष : चांगली कल्पना! आगगाडींत पायांखाली तुडवले जाणारे किती तरी सोन्यामारुती असतात !
वसंता : परंतु तिकीट कोणत्या गांवाचें काढायचे ?
वेदपुरुष : काढ झालें कोठलें तरी !
एक झकपाक पोषाख केलेला गृहस्थ तिकीटमास्तराच्या ऑफीसांत ऐटीनें शिरला व त्यानें तिकीट मागितलें. तिकीटमास्तरानें त्याला दिलें. तो पहा एक शेतकरी खिडकीजवळ गर्दी आहे म्हणून ऑफिसांत हळूंच शिरत आहे. वसकन् तिकीटमास्तर त्याच्या अंगावर आला! ''बाहेर जाव. खिडकीपाशीं जा.''
शेतकरी : तेथें गर्दी आहे रावसाहेब. मी म्हातारा आहें.
स्टेशनमास्तर : माझा बाप कीं काय तूं ? गर्र्दी आहे म्हणे. सर्वांना मिळेल, त्या वेळेस तुला मिळेल. जा बाहेर.
वसंता : खरें म्हटलें तर त्या लखलखीत पोषाख घातलेल्या झब्बूला बाहेर हांकललें पाहिजे होतें. उन्हातान्हांत कष्ट करणार्या त्या म्हातार्या शेतकर्याला आंत अदबीनें बोलाविलें पाहिजे होतें.
वेदपुरुष : तुमच्या समाजांत कर्मशून्यांना मान आहे. जे स्वत: संपत्ति निर्माण न करतां, निर्मिलेली खिशांत भरतात, अशांना तुमच्या समाजांत पूजिलें जातें. खिडकीजवळ उभे राहणारे हे बहुतेक शेतकरी कामकरी असतात,