सोन्यामारुति 73
कल्याण : आतां भूक लागली असेल ?
चंदन : आमच्याकडची भाकर आणूं ? तुम्ही खाल ?
कल्याण : गांधींना सारें चालतें.
वसंता : भाकरी नसती तरीहि चालतें.
चंदन : मला उजडत भाकर लागते, म्हणून आई रात्रीची ठेवून देते. ती शिल्लक असेल, मी घेऊंन येतों.
कल्याण : थोडी चटणी पण आण.
चंदन : तुम्ही चटणी खातां ? मागें एक गांधी आला होता, तो नसे खात.
वसंता : कांदे घेऊन ये.
चंदन : किती लांब आहे त्याचें घर ?
कल्याण : आतां येईल पळत पळत.
वसंता : तुला लिहावाचायला येतें ?
कल्याण : दोन बुकें झालीं व उठलों. थोडें येतें वाचता.
वेदपुरुष : फौजदार वरचेवर येतो का ?
कल्याण : त्याचा या गांवावर राग आहे. मागें आणेवारीच्या वेळेला गांवांतील लोक मामलेदाराला खूप बोलले. त्याच्या तोंडावर बोलले. तेव्हांपासून फौजदार नेहमीं येतो. दटावतो.
वसंता : लोक भितात का ?
कल्याण : मनांतून जळफळतात.
वेदपुरुष : चंदन, किती पळत आलास ?
चंदन : घ्या भाकर, हे कांदे. हा पाण्याचा लोटा भरून आणला आहे.
वसंता व वेदपरुष खाऊ लागले.
चंदन : आई म्हणाली त्यांना जेवायलाच कां आणलें नाहींस ?
वसंता : मग काय सांगितलेंस ?
चंदन : सकाळीं राहिले तर आणूं , मीं म्हटलें.
कल्याण : तुम्ही रहाल ?
वसंता : नाहीं. आम्हांला गेलें पाहिजे.
चंदन : तुम्ही कोठें जाणार ?
वसंता : येथून जवळ कोणता गांव आहे ?