सोन्यामारुति 30
वसंता : धर्माबद्दल लोकांना आस्था आहे.
वेदपुरुष : आपण या झाडावर बसूं या.
वसंता : खरेच !
स्वयंसेवक संघाचा बॅन्ड सुरू झाला. आले. शेटजी आले. सारे उभे राहिले. सोन्यामारुतीकी जय, सनातनधर्मकी जय, जयघोष झालें. मध्येंच कोणीं महात्मा गांधीकी जय असें म्हटलें. त्याच्या पाठींत जोरानें बुक्का बसला! महात्मा गांधीकी जय, कॉँग्रेसकी जय, पुन्हा जयजयकार झाले. सोन्यामारुतीच्या सभेंत हें गांधाळ कां आले कोणास कळेना. सभा नीट व्हावी म्हणून स्वयंसेवकांनी गुद्दागुद्दी थांबवावी, अशी संघाच्या अध्यक्षांकडून सूचना आली. त्यामुळें स्वयंसेवकांचे शिवशिवणारे हात थंड झाले.
सभेला सुरुवात झाली.
पंडित विष्णुशर्मा उभे राहिलें. ते बोलूं लागले
''सभ्यगृहस्थ व सर्व मंडळी, आपण आज अत्यंत महान् प्रसंगी समुपस्थित झालों आहोंत. धर्मावर संकट आलें आहे. सर्वांनी संहति करुन ह्या संकटाचा परिहार परिश्रमपूर्वक केला पाहिजे. आजच्या सभेला श्रीमंत शेटजी यांनीं अध्यक्ष व्हावें अशी मी सर्वाच्या वतीनें त्यांना सविनय प्रार्थना करतों.''
दुसरे एक गृहस्थ उभे राहून म्हणाले, ''पंडित विष्णुशर्मा यांच्या सूचनेला माझें अनुमोदन आहे. शेटजी धर्मात्मे आहेत. हजारोंचे ते पोशिंदे आहेत. त्रिंबकच्या महादेवाला मागें त्यांनीं पन्नास हजारांच मुकुट केला होता. स्वयंसेवक संघास त्यांनीं थोर देणगी दिली आहे. हिंदुधर्माचे ते आधार आहेत. मी जास्त काय सांगूं ?''
शेटजी खुर्चीवर बसले. सनातनधर्मकी जय आरोळी झाली. त्या आरोळींतच जवाहरलालकी जय गर्जना मिसळून गेली. कांहींचीं तोंडे संतापलीं, कांहींनीं आंठ्या घातल्या.
शेटजी बोलावयास उभे राहिले. इतक्यांत एकदम सभेंत लाल बावटा फडकला. ते पहा एक तेजस्वी गृहस्थ व्यासपीठावर चढले. ''क्रांतीचा विजय असो '' ललकार्या झाल्या. सारी सभा क्षणभर स्तंभित झाली.
''मला शेटजींना एकच गोष्ट विचारावयाची आहे. तिचें उत्तार त्यांनीं द्यावें'' ते गृहस्थ म्हणाले.
''शेटजींना घरीं भेटा. ही सोन्यामारुतीची सभा आहे.'' लोक ओरडले.
''मी सोन्यामारुतीसंबंधींच प्रश्न विचारणार आहें'' तो गृहस्थ म्हणाला.