सोन्यामारुति 67
त्या त्या काळांत जें नवीन ध्येय निर्माण होतें, तो राम होय. आणि त्या रामाच्या पाठोपाठ, त्या ध्येयाच्या पाठोपाठ उड्या मारीत जाणारा जीव म्हणजे मारुति होय! आधीं राम आणि मग मारुति! आधीं रामनवमी व मग हनुमानजयंती! ध्येय दिसेपर्यंत जीव पडलेला असतो. परंतु ध्येयाचा रामचंद्र दिसतांच जीव नाचूं लागतो.
वसंता : नवीन ध्येयें कोण देतो ? नवीन राम कोण आणतो ?
वेदपुरुष : ज्याला अपार सहानुभूति असते, तो नवीन ध्येय देतो. जगांतील जास्तींत जास्त जीवनांशीं जो एकरूप होतो, तो अधिक विशाल व अधिक सत्य असें ध्येय देत असतो. भगवान् बुध्द सर्व चराचर जीवनाशीं एकरूप झाले म्हणून चराचरावर प्रेमाचें ध्येय त्यांनी दिलें. वाघांच्या तोंडांत त्यांनीं स्वत:ची मांडी दिली, लंगड्या बकरीला उचलून हदयाशीं धरिलें, बाण लागलेल्या हंसाची शुश्रूषा केली. सर्व चराचरांत, दगडाधोंड्यांतहि चैतन्य पाहणार्या ऋषीनें अद्वैताचें ध्येय दिलें. जगांतील सर्व श्रमजीवि वर्गांशीं एकरूप झालेले महर्षि कार्ल मार्क्स यांनी साम्यावादाचें ध्येय दिलें! नवीन ध्येय स्फुरण्याच्या आधीं, हदय सहानुभूतीनें भरुन आलें पाहिजे. ''भक्तीचीया पोटीं बोध कांकडा ज्योती ॥'' भक्तीच्या पोटांतून बोधाची ज्योति निर्माण होते. हदयांतून ज्ञान बाहेर पडतें. तळमळींतून तेज प्रकट होतें. अशा प्रकारें अहोरात्र दुसर्याच्या सुखदु:खांत हदय व बुध्दि रंगूं लागली कीं त्यांतून एक दिव्य स्फूर्ति बाहेर पडते. समाधीतून ध्येयें निर्माण होतात. विशाल सहानुभूति व विशाल बुध्दि यांच्या ऐक्यांतून नवीन ध्येयबाळ जन्माला येतें. ती नवीन रामनवमी! मग त्या रामाच्या पाठोपाठ वानर धांवतात! बहुजनसमाज धांवतो! मग ते रामाची उपासना करणारे वानर तिरस्कृत न राहतां सोन्यामारुति होतात! अशा त्या त्या काळांतील ध्येयांच्या पायर्या चढून मानवजात वर चढत असते! हा ध्येयसोपान सरळच पायर्यांचा असतो असें नाहीं. हा नागमोगी जिना असतो. परंतु तो वरती चालला आहे !
वसंता : परस्परविरोधी ध्येयें एकाच वेळीं उत्पन्न होतात. कोणतें घ्यावें कोणतें पूजावें ?
वेदपुरुष : जें ध्येय जास्तींत जास्त लोकांचा विचार करतें तें ध्येय पूजावें. अधिकांत अधिक पिळलेल्या जीवनाचा जें विचार करितें तें ध्येय उराशीं धरावें. जगांत कोणता वर्ग मोठा आहे ? कोणता कोणता मोठा वर्ग छळला जात आहे ? त्याच्या जीवनांत सुंदरता आणण्याचें जें ध्येय तें ध्येय म्हणजे आपला राम !
वसंता : जगांत शेतकरी व कामकरी यांचा महान् वर्ग आहे. हा महान वर्ग सारी संपत्ति निर्माण करतो. हा वर्ग महान् असून, निर्माण करणारा असून, सर्वांकडून छळला जात आहे; केवढें आश्चर्य! या वर्गाचा उध्दार करूं पाहणारें ध्येंय मीं उचललें पाहिजे का ?
वेदपुरुष : मी दृष्टि देत आहें. तुला योग्य तें तूं कर.
वसंता : एका वर्गाची बाजू घेतल्यानें दुसरे वर्ग रागावतील ?
वेदपुरुष : भ्रामक, अहंकारी व स्वार्थी रागाला किंमत देऊं नये. निर्मळ अंत:करणाच्या व निर्मळ बुध्दीच्या पुरुषाच्या क्रोधांतहि पावित्र्य असतें. ''क्रोधो हि निर्मलधियां रमणीय एव.'' महात्माजींसारख्यांच्या विचारांशीं विरोध आला तर थोडा वेळ विचार करावा. कारण तेहि पददलितांसाठीं तळमळत आहेत! दु:खी दुनियेसाठीं ज्याच्या हदयाची होळी पेटली आहे असा महात्माजींहून दुसरा कोण दाखवंता येईल! म्हणून त्यांच्याशीं जरा संयमानें बोलावें, विनयपूर्वक आदरानें बोलावे.