सोन्यामारुति 58
आणि वकील, व्यापारी, डॉक्टर, प्रोफेसर, ऐटीनें आंत जाऊन तिकिटें घेतात.
वसंता : ह्या म्हातार्या चें तिकीट मी काढून देतों.
म्हातारा : दे बाबा. हे घे पैसे. गरिबांचे कोणी नाहीं.
वसंता : तुम्ही येथें थांबा.
म्हातारा : होय.
वेदपुरुष : तुमचें किती आहे वय ?
म्हातारा : पाऊणशें आहे.
वेदपुरुष : अद्याप काम करतां का ?
म्हातारा : अजून मी मोट धरतों. खपल्याशिवाय शेतकर्याचें थोडेंच भागणार आहे ?
वसंता : हें घ्या आजोबा .
म्हातारा : देव तुला उदंड आयुष्य देवो.
वेदपुरुष : चला आमच्याबरोबरच.
वसंता : हें का तुमचें गाठोडें ?
म्हातारा : होय. तुम्ही कशाला घेतां ? मी घेतों.
वसंता : माझ्या वडिलांचें मीं घेतलें नसतें का ?
म्हातारा : पूर्वी वयाला मान देत. परंतु आतां कोणी विचारीत नाहीं.
वेदपुरुष : माणसें विचारानें वागत नाहींत.
म्हातारा : बरोबर म्हणतां तें. सारा अधर्म आहें.
वसंता : चला म्हातारबाबा, ती बघा गाडी आली.