गीता हृदय 49
“मोघमन्नं विन्दते अप्रचेता:
सत्यं ब्रवीमि वध इत्सतस्य”
जो अप्रचेतस् आहे, म्हणजे ज्याचें मन प्रगल्भ नाही, ज्याचें हृदय उदार नाही, अशाला अन्नाच्या राशी उगीच मिळाल्या. त्यानें घरांत भरून ठेवलेली कोठारें, ती त्याचा प्राण घेतील.
ऋषीची ही वाणी सत्य आहे ती गोष्ट रशियांत दिसली. सर्वत्र दिसेल. गरीब लोकांच्या सहनशक्तीला कांही सीमा आहे. शंकराला ‘दरिद्र’ व ‘रूद्र’ अशी दोन्ही नावें आहेत. हा दरिद्र मनुष्य कल्याणप्रद शिवशंकरहि आहे. तो तुम्हांला वाचवील. तो मृत्यूंजय आहे. परंतु या दरिद्री मनुष्याचा जर अंतच पहाल तर हा दरिद्र शेवटी रूद्र होईल व तुमचें भस्म करील.
म्हणून यज्ञकर्मं आचरा. जवळ सांचलें तर तें सेवेसाठी द्या. आणि तप आचरा. शारिर, मानसिक वाणीचें तप. शरीर निर्मळ ठेवा. इंद्रियांवर ताबा ठेवा. मन पवित्र ठेवा. ज्ञान मिळवा. बह्मचर्याचे उपासक बना. नवीन नवीन विचार अभ्यासा. आळस करूं नका. असें त्रिविध तप आहे. सेवा करावयास शरीर सतेज हवें. वाणी गोड हवी; विचारांची पुंजी हवी; हृदय उदार हवें. या सा-या गोष्टी या त्रिविध तपांत येतात. वाणीचा संयम ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. एकाद्या कठोर शब्दानें कायमची मैत्री तुटते. मतभेद असूनहि गोड बोलता येईल. मुक्तेश्वरानें म्हटले आहे:
“फुटले मोती तुटलें मन । सांधूं न शके विधाता”।।
फुटलेलें मोती सांधतां येत नाही. तुटलेलें मन जो़डतां येत नाही. म्हणून जपावें. समर्थांनी म्हटलें आहे “बहुत असावे तणावे.” ठायी ठायी मित्रमंडळें असावीत. ओळखी असाव्यात. आधार असावेत. गोड वाणीने हें साधतें.
जगापाशीं जगमित्र । जिव्हेपाशी असे सूत्र
हें सूत्र तुटूं नये. गोड वाणीनें सर्वांना वेड लावावें.