Android app on Google Play

 

गीता हृदय 24

आठव्या अध्यायांतील मरणाच्या भव्य रूपकाचा हा अर्थ आहे. मरण कसें यावें. त्यावेळीं कशी परिस्थिति असावी, कशी नसावी? याचें रूपकात्मक ?? वर्णन आठवा अध्याय देत आहे. दक्षिणायन असतांना करू नये. रात्र असूं नये. धूर असूं नये. कृष्णपक्ष असूं नये. या सर्वांचा अर्थ काय? दक्षिणायनांत दिवस लहान व रात्री मोठ्या. म्हणजे कर्म करायला थोडा वेळ. तसेंच दक्षिणायन आलें म्हणजे आकाश मेघाच्छादित असतें. प्रकाश नाही. याचा अर्थ हृदयाकाश आसक्तीच्या ढगांनी भरून गेलेलें असतें. रात्र असणें म्हणजे जीवनांत कर्मज्वाला धगधगित पेटलेली नसणें. कर्तव्याचा प्रकाश नसणें. धूर असणें म्हणजे नि:शंक ज्ञान नाही. सारेंच संशयी वातावरण. कृष्णपक्ष म्हणजे चंद्राचा क्षय होणें. चंद्र ही मनाची देवता. कृष्णपक्ष असणें म्हणजे मनाचा विकास झालेला नसणें. अशा स्थितीत मरण येणें म्हणजे दुर्दैव होय. ज्याच्या मरणप्रसंगी आसक्ति जल उभी असेल, कर्महीनता समीप असेल, अज्ञानांधकार असेल, संशय असेल, मन खुरटलेलें असेल, त्याचें जीवन व्यर्थ गेलें. याच्या उलट, जो दिवसा मरतो, प्रकाश असतां मरतो, कर्मज्योति झगझगित पेटत असतां मरतो, उत्तरायणांत म्हणजे हृदयाकाश निर्मळ असतांना, कर्म करायला मोठे दिवस असतांना अनासक्त मनानें जो मरतो, शुक्लपक्षांत म्हणजे मनाचा विकास होत असतां जो मरतो, तो धन्य होय. तें मरण म्हणजे जीवनच. परम थोर असें तें मरण असतें.

आपण असें मरण यावें म्हणून सारखी धडपड केली पाहिजे. आसक्ति, आलस्य, वासना-विकार या सर्वांना जिंकून घेतलें पाहिजे. कृष्णाची मुरली शरदृतंतू वाजली. ज्या वेळेस आकाश निर्मळ आहे, चांदणें पडलें आहे, फुलांचा सुगंध सुटला आहे अशा वेळेस मुरली वाजते. आपल्या जीवनांत ती गोड मुरली तेव्हां वाजेल, जेव्हां सारे मोह आपण जिंकून घेऊं; सारखे अनासक्त रीतीनें, निष्काम बुद्धिनें जनताजनार्दनाची आपल्या स्वधर्मानुसार सेवा करीत राहूं. महात्माजी एकदां म्हणाले “मला इतर आसक्ति उरली नाही. परंतु या चरख्याची काळजी वाटते. मरतांना रामनाम ओंठी येण्याऐवजी या चरख्याची चिंता नाही ना येणार? चरखा चरखा असें करीत नाहीं ना मरणार? चरख्यांत आतडें गुंतून राहील की काय?” स्वर्गीय जमनालालजी महात्माजींस म्हणाले “तुम्ही चरख्याची चिंता नका करूं. तो मरणार नाही.”

महात्माजींचे हें असें जीवन आहे. रात्रंदिवस कर्मज्वाळा पेटून राहिली आहे. धूर नाही. आसक्ति नाही. सर्वत्र स्वच्छ प्रकाश. १९३१ साली आयर्विन साहेबांजवळ वाटाघाटी करतां करतां रात्री दोन वाजले. परंतु इतक्या रात्री घरी आल्यावर सूत कांतायचें राहिलें म्हणून चरखा हाती घेऊन कांतणारे हे महात्माजी आहेत. प्रत्येक क्षण सेवेंत जात आहे. निर्मळ निरपेक्ष अनासक्त सेवा.

आपणहि नम्रपणें स्वत:चे जीवन कर्मज्वालेनें प्रकाशित करण्यासाठीं धडपडूं या. जीवनाचें सोनें करूं या. या मृण्मय शरिरांत अमृतत्व मिळवूं या. तो शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून, धन्यतेचें नरण यावें म्हणून जाणारा प्रत्येक जिवस नीट जगूं या. तरच शेवटी तरणोपाय आहे.

गीता हृदय

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
गीता हृदय 1
गीता हृदय 2
गीता हृदय 3
गीता हृदय 4
गीता हृदय 5
गीता हृदय 6
गीता हृदय 7
गीता हृदय 8
गीता हृदय 9
गीता हृदय 10
गीता हृदय 11
गीता हृदय 12
गीता हृदय 13
गीता हृदय 14
गीता हृदय 15
गीता हृदय 16
गीता हृदय 17
गीता हृदय 18
गीता हृदय 19
मी शास्त्रज्ञ झाले तर
गीता हृदय 21
गीता हृदय 22
गीता हृदय 23
गीता हृदय 24
गीता हृदय 25
गीता हृदय 26
गीता हृदय 27
गीता हृदय 28
गीता हृदय 29
गीता हृदय 30
गीता हृदय 31
गीता हृदय 32
गीता हृदय 33
गीता हृदय 34
गीता हृदय 35
गीता हृदय 36
गीता हृदय 37
गीता हृदय 38
गीता हृदय 39
गीता हृदय 40
गीता हृदय 41
गीता हृदय 42
गीता हृदय 43
गीता हृदय 44
गीता हृदय 45
गीता हृदय 46
गीता हृदय 47
गीता हृदय 48
गीता हृदय 49
गीता हृदय 50
गीता हृदय 51
गीता हृदय 52