गीता हृदय 30
पोषित तीरींचे पादप । फेदीत जगाचे पापताप
जाय जैसे आफ । जान्हवीचें ।।
सर्व भूप्रदेश हरितश्यामल करीत जाणारी ती गंगा ! रविन्द्रनाथांना नद्यांचे प्रवाह पाहतांच जणुं उचंबळून येत असे. ते म्हणतात:
“ जान्हवी-जमुना विगलित करूणा”
गंगा-यमुना म्हणजे ईश्वराची वाहती करूणा आहे ! अशा या थोर नद्यांच्या ठाय़ी प्रभुरूप पहा.
आणि वरचें हें अनंत आकाश ? वादळें येतात व जातात. धूळ उडते. धुके येतें. मेघमाला येतात. परंतु आकाश निळें निळें पाठीमागें उभें आहे. इवलाहि मळ स्वत:ला लागूं देत नाही. या आकाशाचे ठायी परमेश्वर पहा.
आणि ह उचंबळूणारा अनंत सागर ? भरती असो वा ओहोटी असो, तो सारखा धों धों करीत आहे. “मामनुस्मर युद्धय च” अशी जणुं घोषणा करीत आहे. भरती असो वा ओहोटी असो, तूं कर्म करीत रहा, असें जणुं तो धीरगंभीर वाणीनें सांगत आहे. जणुं ॐ ॐ ची गर्जना रात्रंदिवस करीत आहे. पाऊस पडो वा न पडो, की सदैव उचंबळतच असतो. सर्व प्रवाहांना जवळ घेतो. कधीं शांत तर कधी अत्यंत भयंकर ! असा हा सागर त्याच्या ठायीं मला पहा. तो इंग्रज कवि बायरन समुद्र पाहून उचंबळे, नाचे. तो म्हणतो “सागरा, कर गर्जना कर. तुझ्या लाटांचा कल्लोळ सुरू ठेव. ये, नाचत नाचत ये. अरे सागरा, तूं त्या अदृश्य परमेश्वरांचे जणुं सिंहासन आहेस.” अशा या सागराचे ठायी भव्य दिव्य परमेस्वर नाही पहायचा तर कोठें पहायचा ?
आणि ती कोकिळा ? वसंत ऋतु येतांच जी कुऊ कुऊ करूं लागते. कोठे आहे प्रभु, उन्हाळ्यांत झाडांना नव पल्लव देणारा तो प्रभु कोठे आहे, असें जणुं ती विचारते. जणुं पहाटेपासून उपनिषद गाते. त्या कोकिळेच्या ठिकाणी देव मान. आणि ज्याचा पिसारा पाहून शहाजहान बादशहाचें मयुरासन फिकें पडावें असा तो सुंदर मोर? मेगांचा गडगडाट ऐकून नाचणारा, केकारव काढणारा, सरस्वतीचें दिव्य वाहन होणारा, त्या मोराच्या ठिकाणी परमेश्वर पहा. आणि गोमाता ? गाय म्हणजे करूणाकाव्य आहे. किती कोमळ, प्रेमल व स्वच्छ ! ती दूध देते. शेतीला बैल देते. तिच्या ठिकाणी देवस्वरूप पहा.