गीता हृदय 38
तेराव्या अध्यायांत पुढील श्लोक आहे:
“उपद्रष्टाऽनुमन्ता य भर्ता भोक्ता महेश्वर:”
प्रभु प्रथम उपद्रष्टा असतो. तो जवळ उभा राहून तुमच्याकडे पाहतो. बोलत नाही. तुमचें केव्हां तरी लक्ष मिळेल या आशेंने तो असतो. कधी हळूंच बोलला तरी तें आपणांस ऐकु येत नाही. परंतु ??गांतील अनुभवानें आपण जर अंतर्मुख होतों. जीवन चांगलें जगावें असें मनांत येऊं लागते. जीवनांत विवेक येतो. असें करावें, असा निश्चय करावा, आजपासून हें ध्येय, असे बेत आपण करूं लागतों. त्या अंतर्यामीला आनंद होतो. तो हळूंच होकार देतो. अनुमति देतो. “बाळ, असाच वाग हो. चांगला आहे तुझा निश्चय. तो टिको” असें तो उपद्रष्टा आतां केवळ दुरून बघणारा न राहतां जवळ येतो. पाठीवर शाबासकी देतो. तो अनुमंता होतो पुढें आपम धडपडत जातों. संकटांत आधार कोठून तरी मिळतो. अंधारांत प्रकाश येतो. वाटतेंकी प्रभुच साहाय्य देऊन राहिला आहे. तोच भर्ता. तोच आधार. त्या अंतर्यामीविषयी अपरंपार भक्तिप्रेम वाटतें. सारा अहंकार गळतो आणि आपण म्हणतों “देवा, तुझाच आधार आहे. तूंच प्रकाश दिलास. तूंच सांभाळलेस. तूंच माझें तारण केलेंस. माझ्या हातून जें काही झालें असेंल, तें तुझ्या कृपेचें फळ. जे काही माझ्या हातून झालें असेल, तें तूंच घे. तूंच त्याचा भोक्ता हो. या चराचराचा चालक तूं. तू महेश्वर. तूं माझ्या हृदयांत बसून मला हळुहळूं सन्मार्गावर आणलेंस तुझी ही कृपा.”
असें शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतात. वृत्ति निरहंकार होते आणि जीवनाच्या शेतांत आपण सदगुणाचे पीक घेऊं लागतो. एक गुण आला की त्याच्या ओढीनें दुसरा येतो, आणि ही सदगुणसंपत्ति वाढूं लागते. जीवनांत ज्ञानाची प्रभा फांकते. कर्में सुंदर व निर्मळ होऊं लागतात. जीवनाचें हेच साफल्य. जन्माला येऊन दुसरें काय मिळवायचें ?