गीता हृदय 10
“रूक्मिणीनें एका तुळसिदळानें गिरिघर प्रभु तुलिला”
असें बायकांच्या गाण्यांत आहे. सत्यभामेनें सारे अलंकार पारड्यात घातले तरी कृष्णाची तुला होईना. परंतु भावभक्तीनें भरलेलें एक पान रूक्मिणीनें ठेवलें आणि कृष्णाचें पारडें वर गेलें. सुदामदेवानें कृष्णासाठी चार मुठी पोहे आणले. परंतु द्वारकेचा राणा त्या पोह्यावर जणुं तुटून पडला. सुदाम्याला सोन्याची नगरी देऊनहि त्या पोह्यांची किंमत पुरी करतां आळी नसती. ते पोहे साधे नव्हते. ते जणुं मंतरलेले होते. त्या पोह्यांत सुदाम्याचें प्रेमळ हृदय होतें.
वस्तु लहान कीं मोठी हा प्रश्न नाहीं. तिच्यांच तुमचें हृदय आहे की नाहीं हा प्रश्न आहे. शेतक-यांची एक म्हण आहे “ओली पेर पण खोली पेर.” शेतांत जो दाणा पेरावयाचा तो खेल पेरला पाहिजे आणि तेथें ओलहि हवी. तरच अंकुर येईल. त्याप्रमाणें आपलें कर्म मारून मुटकून केलेलें नसावें. त्यांत हृदयाचा ओलावा असावा. आपण दक्षिणा देतों. ती ओली करून गेतों. वर तुळशिपत्र ठेवून देतों. त्यांतील हेतु काय? ती दक्षिणा पै पैसा असेल. परंतु हृदयाचा ओलावा जर तेथें असेल तर त्या पैचें कुबेराच्या सर्व संपत्तीहून अधिक मोल आहे. आपल्या नावानें दगड बसवण्यासाठी लाखों रूपयांच्या देणग्या देतात, त्या काय चाटायच्या? त्यापेक्षां भक्तिप्रेमानें उचंबळून दिलेली दिडकी अधिक थोर आहे. भीम इतरत्र कितीहि जेवला तरी कुंतीच्या हातचा एक घांस घेतांच त्याला ढेंकर येई. आईच्या हातचा घांस ! त्यांत अमृताचे सागर आहेत. आईनें चार ओळीचें पत्र पाठवलें आणि दुस-या कोणी अर्धा शेर वजनाचा निबंध लिहून पाठवला तरी आईच्या त्या चार ओळी अधिक वजनदार आहेत. रामायणांत वर्णन आहे कीं, प्रभु रामचंद्रांनी मृत झालेल्या वानरांकडे प्रेमानें पाहिलें आणि ते सारे अव्यंग होऊन सजीव होऊन उठले. रामरायांनी किती भावनोत्कट वृत्तीनें पाहिलें असेल ! त्यांचा सारा आत्मा त्या दृष्टींत असेल. तुम्ही कितीहि डोळे ताणलेत, रामानें किती अंशांचा कोन करून पाहिलें असेल तें ठरवून पाहिलेंत, तरी त्यानें काय होणार आहे?
कर्मांत विकर्म ओता. बाह्य कर्मांत हृदयाचा सहकार मिसळा. महणजे तें कर्मं प्राणमय होईल. तें जिवंत कर्म होईल. आणि पुन्हां त्या कर्माचा तुम्हांला मुळीच बोजा वाटणार नाही. आईला मुलाची सेवा करून कधी कंटाळा येतो का? तुम्ही एकाद्या आईला विचारून पहा. “हे माते, या आजारी मुलाची तूं किती दिवस शुश्रुषा करणार? आतां याला दवाखान्यांत नेऊन आम्हांला शुश्रुषा करूं दे ” असें तुम्ही जर म्हणाल तर ती माता म्हमेल “ मी नाही हो थकल्यें. मी काय मोठेसें केलें? माझा आनंद नेऊं नका.” रात्रंदिवस सेवा करूनहि आईला आनंद वाटतो. का? कारण तिच्या सेवेंत विकर्म आहे. मनाचा सहकार आहे.
कर्मांत विकर्म मिसळलें म्हणजे त्याचें अ-कर्म होतें. ज्या कर्मांत हृदय ओतलेलें आहे त्या कर्माचा बोजा वाटत नाहीं. करून न केल्यासारखेंच जणुं वाटतें. जनाबाई सारखें दळीत होती. तिला थकवाच जणुं नाही. पांडुरंग जणुं तिला हात लावीत होता. भावभक्तीचा पांडुरंग, आंतरिक जिव्हाळ्याचा पांडुरंग तिच्या जोडीला होता. म्हणून तिला कंटाळा नसे. थकवा नसे. रात्रंदिवस दळून जणुं ती मुक्त होती.