गीता हृदय 3
अर्जुन संन्यासधर्मी होऊं पाहतो. त्याची फजिती होईल हें श्रीकृष्ण जाणतात. म्हणून त्याच्या सर्व बुद्धिवादाला ते “प्रज्ञावाद” म्हणतात. अर्जुनाला मारून मुटकून संन्यासी करण्यांत काय अर्थ? केवळ त्याच्या डोक्यावर हात ठेवूनहि त्याला संन्यासी करणें बरें नव्हे. जो तो स्वत:च्या आंतरिक धडपडीनें ध्येयाकडे जाऊं दे.
सारांश, अर्जुन मोहामुळें, आसक्तीमुळें स्वधर्म टाळूं पाहतो. मोह व आसक्ति जिंकणें ही खरी गोष्ट आहे. अनासक्त होऊन स्वधर्मकर्मांचें आचरण करणें हें सर्वांचे कर्तव्य आहे. मोह जिंका व अनासक्त व्हा. असे होऊन स्वधर्मकर्म आचरा. गीता हें शिकविण्यासाठी जन्मली आहे. अठराव्या अध्यायाचे शेवटी “कच्चिदज्ञान संमोह: प्रणष्टस्ते धनंजय” अर्जुना, गेला का मोह? असें श्रीकृष्ण विचारतात. अर्जुन उत्तर देतो “नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा” मोह गेला, भान आले, स्वधर्माचरणाची जागृती आली, असें म्हणतो.
कर्तव्यकर्में करीत असतांना जे मोह आड येतात, आसक्ती आड येतात, त्या कशा दूर कराव्या व कसें झगडावे हें सांगण्यासाठी गीताशास्त्र आहे. पहिल्या अध्यायांत उपदेशाचा आरंभ नाही. परंतु अर्जुन कोणत्या भूमिकेवर उभा आहे हें समजण्यासाठी पहिल्या अध्यायाची जरूरी आहे. गीताशास्त्राची उत्पत्ति कशासाठी झाली हें कळण्यासाठी पहिला अध्याय हवा.
गीता ही केवळ अर्जुनासाठी नाही. केवळ क्षत्रियासाठी नाहीं. ती तुम्हां आम्हां सर्वांसाठी आहे. सर्व सांसरिकांसाठी आहे. आपण सारे एक प्रकारें क्षत्रियच आहोंत. तुकारामांनी म्हटलें आहे:
“रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग
अंतर्बाहृ जग आणि मन”
रात्रंदिवस आपणा सर्वांचा जनांत व मनांत झगडा चाललेलाच असतो. प्रत्येकजण आपल्या कर्तव्यकर्मांच्या ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ उभा असतो. तेथें मोह आडवे येतात. आसक्ती आड येते. तेथें झुंजावें लागतें. ते मोह कसे जिंकावे, आसक्ती कशी दूर करावी हें गीता आपणां सर्वांस सांगत आहे. म्हणून सर्वांना या शास्त्राची जरूरी आहे. उंच डोंगरावर पाऊस पडतो. अर्जुनासारख्या महापुरुषाच्या मस्तकावर श्रीकृष्णांनी सदुपदेशाची अमृतवृष्टि केली. व्यासांनीं तो प्रवाह बांधून तुम्हां आम्हां सर्वांसाठी आणला आहे. त्यांचे थोर उपकार. अर्जुनाला निमित्त करून सर्वांनाच येथें उपदेश केलेला आहे. आपण सारेच ऋजु होऊन, सरळ व निर्मळ होऊन, ज्ञानमय कृष्णाजवळ बसूं या मोह जिंकून, अनासक्त होऊन स्वधर्मकर्म आचरून समाजसेवा कशी करावी व जीवन कृतार्थ कसें करावें तें शिकूं या.