गीता हृदय 47
कोणताहि मार्ग घ्या. लोकांना सुखी करा. जीवनाच्या आवश्यक गरजा सर्वांच्या भागल्या पाहिजेत. अन्नवस्त्र, ज्ञान, विश्रांति, आनंद सर्वांना मिळाली पाहिजेत. आज अशी परिस्थिति आहे की सर्वांना या वस्तू देतां येतील; नीट योजना मात्र हवी. संशोधनाचा मानवी सुखासाठी उपयोग केला म्हणजे हे सारें होईल.
पंडित जवाहरलाल एकदां म्हणाले “कोट्यावधि लोक अन्नवस्त्रास पारखे असतां, ज्ञानानंद व कलानंद यांना पारखे असतां, धर्मांच्या व संस्कृतीच्या गप्पा हे लोक मारतात तरी कसें ? खरें आहे. खरा धर्म अद्याप यावयाचा आहे.
“सर्वेऽत्र सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामया:
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा काश्चिददु:खमाप्नुयात्” ।।
असें नुसतें पुटपुटून भागणार नाही. हें मनोहर व मंगल दृश्य जगांत प्रत्यक्ष दिसावें म्हणून सर्वस्वार्पण बुद्धिनें झगडायला जो उभा राहिल तो खरा देवाचा लोडका. तो खरा ज्ञानी. तो खरा भक्त.